वेणा जलाशयात बुडालेल्या सात तरुणांचे मृतदेह सापडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

बाजारगाव/धामना - वेणा जलाशयात काल सायंकाळी नाव उलटून बुडालेल्या दहापैकी सात जणांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेत तीन तरुणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. बेपत्ता असलेल्या अन्य एकाचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.

बाजारगाव/धामना - वेणा जलाशयात काल सायंकाळी नाव उलटून बुडालेल्या दहापैकी सात जणांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेत तीन तरुणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. बेपत्ता असलेल्या अन्य एकाचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.

नागपूर - अमरावती महामार्गानजीक वेणा जलाशयात काल नागपूर आणि परिसरातील दहा तरुण सहलीसाठी गेले होते. जलविहार करताना त्यांनी सेल्फीही काढले. शिवाय घटनेची आठवण म्हणून फेसबुक लाइव्हदेखील केला. मात्र, काही वेळाने एकाच बाजूला अधिक भार झाल्यामुळे नाव उलटली. यात नावाड्यासह सर्व जण बुडाले. घटनेची माहिती कळमेश्वर पोलिसांना मिळाली. तब्बल दोन ते अडीच तासाने बचावकार्य सुरू झाले. आजूबाजूच्या गावातील मच्छीमार तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. रविवारी रात्री साडेनऊपर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, काल राहुल दिलीप जाधव या एकाच तरुणाचा मृतदेह हाती लागला. उर्वरित आठ जण बेपत्ता होते. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. सायंकाळपर्यंत सात जणांचे मृतदेह सापडले. अंकित अरुण भोस्कर (वानाडोंगरी), रोशन ज्ञानेश्वर खांडारे (पेठ, काळडोंगरी), परेश राजकुर काटोके (नागपूर) आणि अक्षय मोहन खांदारे यांचे मृतदेह सापडले. बुडालेली नावदेखील सापडल्यानंतर तीनच्या सुमारास प्रतीक रामचंद्र आमडे, तर पाच वाजता पंकज डोमाजी डोईफोडे (नागपूर) याचा मृतदेह पाणबुड्यांनी शोधून काढला. सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता अतुल भोयर याचा ठावठिकाणा लागला नाही.

मुख्यमंत्र्यांकडून दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या वारसांना सरकारकडून नुकसानभरपाई देण्याचे आश्‍वासन दिले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

Web Title: bajargav vidarbha news ten youth drowned in vena lake