बाळापूरमध्ये महायुतीत बंडखोरी?

मनोज भिवगडे
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

- शिवसंग्रामच्या प्रदेश उपाध्यक्षांचे सोशल मीडियावरून संकेत

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामकडून बंडोखोरीचे संकेत मिळत आहे. महायुतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण केल्याने शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील नाराज आहेत. त्यांनी फेसबुकवरून "जय गजानन महाराज, आमचं ठरलं' असा संदेश देऊन उघड-उघड बंडोखोरीची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसमोर बंडोखोरीचे आव्हान निर्माण होऊ शकते.
भाजप-शिवसेना महायुतीमध्ये शिवसंग्राम हा प्रमुख घटक पक्ष आहे. मराठा आरक्षणासह शिवस्मारकाच्या स्थापनेतून शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनाकराव मेटे यांनी महायुतीत मानाचे स्थान मिळविले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बाजूला ठेवण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये त्यांना सन्मानजनक जागा मिळण्याची आशा होती. भाजप-शिवसेनेकडून मित्रपक्षांसाठी जागा सोडण्याचे संकेतही मिळाले होते. त्यामुळे शिवसंग्रामने अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड आणि बाळापूर या दोन मतदारसंघावर दावा केला होता. शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी बाळापूर मतदारसंघ शिवसंग्रामला सुटणार असल्याचा दावा करीत प्रचाराला व मतदारांच्या गाठीभेटीला सुरुवात केली होती. मात्र, पितृपक्ष संपताच घटस्थापनेच्या दिवशी शिवसेनेने बाळापूर मतदारसंघातून नितीन देशमुख यांनी उमेदवारी जाहीर करीत एबी फॉर्मचे वितरण केले. त्यामुळे शिवसंग्रामला बाळापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही, हे निश्‍चित झाले. शिवसेनेचे एबी फॉर्म वितरित होताच संदीप पाटील यांनी सोशल मीडियातून बंडखोरीचे संकेत दिले.

2914 मध्येही अपक्ष म्हणून उमेदवारी
भाजपसोबतच्या युतीत 2014 च्या निवडणुकीतही उमेदवारी न मिळाल्याने संदीप पाटील बाळापूरमधून अपक्ष लढले होते. 18 हजारांवर मते घेऊन त्यांनी थेट भाजपच्या उमेदवारालाच आव्हान दिले. त्यामुळे बाळापूर मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

अखेरचा जोर लावण्यासाठी मुंबईत
महायुतीकडून बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला जागा मिळाल्याने नाराज झालेले मित्र पक्ष शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील यांनी सोमवारीच तडकाफडकी मुंबई गाठली. येथे ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी अखेरचा जोर लावणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balapur vidhansabha constituency