कर्जमाफीसाठी आता बळीराजाचाच आंदोलनाचा बिगुल

प्रमोद काळबांडे
बुधवार, 5 एप्रिल 2017

परडा (ता. समुद्रपूर) - "आमच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर ही सरकारचीच देण आहे; आमच्या नाकर्तेपणाची किंवा अस्मानी संकटाची नाही. सरकारच्या आयात-निर्यातीच्या बेटाइम धोरणामुळे कर्ज थकीत झाले. कर्जमाफीची आम्ही भीक मागत नसून तो आमचा हक्क आहे. तो मिळविण्यासाठी आता आम्हीच लढू', असा निर्धार परडा येथील शेतकऱ्यांनी आज व्यक्त केला. बुधवारी (ता. 5) समुद्रपूर तहसील कार्यालयावर ते धडकणार आहेत.

"कर्जमाफीवर सरकारकडून उडवाउडवीची घोषणाबाजी सुरू आहे. विरोधकांची संघर्ष यात्राही थंडावली आहे. शेतीच्या हंगामाला उणेपुरे दोन महिने असताना कर्जमाफीचा निर्णय आताच झाला नाही, तर शेतकरी पुरता हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. तत्काळ कर्जमाफी द्या. आत्महत्येचा बट्टा आमच्या गावाला लागू देऊ नका', अशी समजही परड्यातील शेतकऱ्यांनी दिली.

परडा हे 350 कुटुंबांचे गाव. 90 टक्के कुटुंबांची उपजीविका शेतीवर अवलंबून. तब्बल 600 हेक्‍टर शेती. त्यापैकी 25 टक्के ओलिताची, तर 75 टक्के कोरडवाहू. प्रत्येकच शेतकरी कर्जात नखशिखांत बुडालेला. तब्बल 10 कोटी रुपयांहून जास्त कर्जाचा गावावर बोझा.

सरपंच प्रवीण महाजन यांची 23 एकर शेती असून, सहा लाख रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे. "माझ्या कर्जाचा गुन्हेगार सरकारच आहे. 2010-11 मध्ये मला 100 क्विंटल कापूस झाला. सरकारने त्या वेळी निर्यातबंदी आणली. त्यामुळे माझे चार लाखांचे नुकसान झाले. म्हणूनच मी कर्ज फेडू शकलो नाही. सरकारने तूर आयात केली आणि यंदा त्यातही घाटा आला. म्हणायला एवढी शेती, पण माझ्यापुढे संकटांचा डोंगर उभा झाला आहे. गावातील सर्वच शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे.'
गावचे सरपंच अर्जुन गोविंदराव महाकाळकर यांची 14 एकर शेती आणि त्यांच्यावर एक लाखाचे कर्ज आहे. "बॅंकांनी दोनदा कर्जाचे पुनर्गठण केले. आता होणे नाही', असे त्यांनी सांगितले. सुनील जनार्दन महाजन यांची सहा एकर शेती आणि चार लाखांचे कर्ज आहे. डाळिंबाची शेती केली. नापिकी झाली. आता पुढचे पीक घेण्याची विवंचना त्यांच्यापुढे आहे. पिंटू महादेवराव महाजन या तरुण शेतकऱ्याची पाच एकर शेती आणि तब्बल 40 लाखांचे कर्ज आहे. "गोट फॉर्मसाठी कर्ज घेतले होते. आता क्राप लोन कसे भेटेल?' असा प्रश्‍न त्याच्यापुढे आहे.

माणीबाई महाजन यांची पाच एकर शेती आणि अडीच लाखांचे कर्ज आहे. "हप्ते भरण्याची हैसियत नाही. करंटमध्ये कोन लोन दिन?' असा प्रश्‍न त्यांना सतावत असतो. संगीता घाटुर्ले यांची चार एकर शेती आणि दोन लाखांचे कर्ज आहे. त्यांची कर्जापायी झोप उडाली आहे.

कृष्णा आणि वासुदेव चंपत महाकाळकर भावांची प्रत्येकी तीन एकर शेती आणि अनुक्रमे तीन लाख आणि दोन लाखांचे कर्ज आहे. सुभाष बाबूराव महाकाळकरकडे अडीच एकर शेती आणि दोन लाखांचे कर्ज आहे. कर्जाच्या दरीत बुडालेले असे सारेच शेतकरी आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत.

कर्जमाफीसाठी ग्रामसभेचा ठराव
लवकरच ग्रामसभा घेऊन कर्जमाफी देण्याचा ठराव घेण्यात येईल. कर्जमाफी मिळेस्तोवर आंदोलन सुरू राहील. शेजारच्या अनेक गावांनीही आंदोलनाची तयारी केली आहे, अशी माहिती आजी आणि माजी सरपंच अर्जुन महाकाळकर आणि प्रवीण महाजन यांनी दिली.

उधळण्यासाठी निधी, कर्जमाफीसाठी का नाही?
हिंगणघाट येथील शेतकरी आणि आंदोलक नेते प्रा. दिवाकर गमे गावागावांत फिरून कर्जमाफीविषयी शास्त्रशुद्ध मांडणी करीत आहेत. सरकारकडे उद्योजक, पगारदार, स्मारके, मेट्रो ट्रेन, नवे महामार्ग यावर उधळण्यासाठी लाखो-कोटींचा निधी आहे. परंतु, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील कर्जमाफीसाठी 32 हजार कोटी रुपयेही का नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

Web Title: baliraja agitation for loan waiver