चेंडू नदीत गेल्याने झाला घात...गोंदियात नदीत बुडणाऱ्या तिघांना वाचविले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 15) दुपारी 12च्या सुमारास घडली; तर गोंदिया जिल्ह्यात बिरसोला संगमघाट येथील वैनगंगा नदीत बुडत असणाऱ्या तीन युवकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. 

पवनी (जि. भंडारा) : मकरसंक्राती आली की नदीवर आंघोळीसाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढते. सागर चंद्रपूर जिल्ह्यातील पाहरणी (ता. नागभीड) येथील रहिवासी आहे. मकरसंक्रातीनिमित्त जिल्ह्याला लागूनच असलेल्या नागभीड तालुक्‍यातील अनेक नागरिक अंघोळीसाठी पवनी तालुक्‍यातील वैनगंगेच्या विलम घाटावर आले.

दुपारी नदी पात्रातील वाळूवर खेळत असताना चेंडू नदीत गेला. तो काढण्यासाठी सागर नदीच्या आत गेला असता, पाण्याचा अंदाज चुकल्याने तो बुडाला. 

दहावीचा विद्यार्थी होता 

यावेळी उपस्थितांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला. दुपारी एक वाजेनंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सागर हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. याप्रकरणी पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. 

Image may contain: one or more people, people standing, ocean, outdoor, nature and water
गोंदिया : युवकांना पाण्याबाहेर काढताना शोध व बचाव पथकाचे कर्मचारी.

म्हणून वाचले तीन युवकांचे प्राण

गोंदिया : मकरसंक्रांतीनिमित्त बिरसोला संगमघाट येथील वैनगंगा नदीत बुडत असणाऱ्या तीन युवकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. ही घटना बुधवारी (ता. 15) दुपारी 3 च्या सुमारास घडली. 

अशी आहेत तिघांची नावे 

बिरसोला संगमघाट येथील वैनगंगा नदी काठावर मकरसंक्रांतीनिमित्त यात्रा भरली होती. या यात्रेला कार्तिक रहांगडाले (वय 22, रा. बघोली), कपिल देवधारी (वय 21, रा. बाजारटोला) व विशाल बैरवाल (वय 20, रा. भद्याटोला) हे आले होते. 

क्लिक करा : अहो आश्‍चर्यम्‌ नवेगावमध्ये आढळले अल्बिनो सांबर

तिघेही नदीत उतरले 

तिघांनाही पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे ते नदीत उतरले. क्षणातच पाण्यात गटांगळ्या खावू लागल्याने तिथे उपस्थित शोध व बचाव पथकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लगेच नदीत उडी घेऊन तीनही जणांना सुखरूप बाहेर काढले. 14 जानेवारीपासून 7 सदस्य चमू बिरसोला संगमघाट येथे तैनात आहे. 

पोलिसांनी केली मदत 

पोलिस हवालदार खोब्रागडे, पोलिस नायक उईके, पोलिस नायक बोपचे, पोलिस कॉन्स्टेबल रहांगडाले, पोलिस कॉन्स्टेबल कराडे, पोलिस कॉन्स्टेबल भांडारकर, नायक पोलिस शिपाई जावेद पठाण यांनी या तिन्ही युवकांना सुखरूप बाहेर काढले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ball fell into the river and youth drown... rescued the three drowned at gondia