वनमंत्र्यांच्या "ड्रीम प्रोजेक्‍ट'ला सोन्याची झळाळी

File photo
File photo

चंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थ, नियोजन व वनखात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर बांबू धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे जागतिक दर्जाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्धार वनमंत्र्यांनी व्यक्त केला होता. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्याच बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. देशातील ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या उपस्थितीत बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे भूमिपूजन झाले. बघता बघता हा प्रकल्प चंद्रपूर-गडचिरोली व आजूबाजूच्या परिसरातील कौशल्य विकासाचे प्रमुख केंद्र झाले आहे. या केंद्रामुळे देशाच्या ईशान्यकडील बांबू उत्पादक प्रदेशाशी चंद्रपूरचे व्यावसायिक नाते जोडले गेले आहे. या ठिकाणावरून चीन, जपान व अन्य बांबू उत्पादक देशांसोबतही वैचारिक व प्रशिक्षणाची भागीदारी होत आहे.
या केंद्रामार्फत जिल्ह्यातील आतापर्यंत 1 हजार महिलांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. यामुळे बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याच्या उद्योगाला चालना मिळाली. याशिवाय बांबूपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी विक्री केंद्र उभारली जात आहे. अमेझॉन व अन्य प्रतिष्ठित अशा वस्तू विक्री संस्थांची या केंद्राचा संपर्क आला आहे. बांबू हॅंडिक्राफ्ट ऍण्ड आर्ट युनिट हा उपक्रम या प्रक्रियेत मैलाचा दगड ठरला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, चंद्रपूर, विसापूर, पोंभूर्णा, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत बांबू हॅण्डिक्राफ्ट ऍण्ड आर्ट युनिटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. चिचपल्ली, मूल आणि चिमूर या ठिकाणी हे युनिट लवकरच कार्यरत होणार आहे. या ठिकाणी तयार झालेला तिरंगा ध्वज हा देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात फडकला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत या ठिकाणच्या वस्तू पोहोचल्या आहेत. या केंद्रातून वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यासक्रमांनाही सुरुवात झाली आहे. बांबूपासून वस्तू तयार करण्याच्या डिप्लोमाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कौशल्य विकास केंद्राने आपले अस्तित्व ठळकपणे सिद्ध केले आहे. आता या कौशल्यविकास व रोजगारनिर्मितीच्या केंद्राला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. नुकताच प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्कॉच संस्थेच्या सुवर्णपदकाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला सन्मानित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com