अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी पावसाचा तडाखा

प्रतिनिधी
सोमवार, 24 जून 2019

आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या केळी उत्पादकांना शनिवारी (ता. २२) रात्री झालेल्या वादळ व पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अकोट तालुक्यातील विविध गावांतील केळी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

अकोला - आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या केळी उत्पादकांना शनिवारी (ता. २२) रात्री झालेल्या वादळ व पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अकोट तालुक्यातील विविध गावांतील केळी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी (ता. २३) अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे याबाबत ई- मेलद्वारे माहिती कळविली आहे.

थंडी, उष्णतामान आणि पाणी कमी झाल्याने केळीच्या बागांचे आधीच ५० टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बागा कापून टाकल्या आहेत. ज्या बागा शिल्लक होत्या त्यातील झाडे कमकुवत झाली होती. शनिवारी रात्री सहा ते आठ या वेळेत अचानक वादळासह पाऊस झाला. यात केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळीची झाडे जमीनदोस्त झाली. पाने फाटून गेली. घडांचेही नुकसान झाले. या आपत्तीमुळे पणज महसूल मंडळातील केळी उत्पादकांचे किमान दोन कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

पणज, अकोली, रूईखेड, गौलखेड, शहापूर, बोचरा, धामणगाव, महागाव, राजूरा, अंबोडा अशा विविध गावांत केळीचे पीक सर्वाधिक घेतले जाते. मागील वर्षभरापासून हे केळी उत्पादक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. आधी थंडीमुळे बागांचे नुकसान झाले. त्यातून सावरत नाही तर उन्हाचा जोरदार तडाखा या बागांना बसला. सोबतच अनेक शेतकऱ्यांकडील पाणी आटल्याने उभ्या बागा वाळल्या. यात ज्यांच्या बागा सुस्थितीत राहिल्या त्या शेतकऱ्यांना आता शनिवारच्या वादळाने मोठा फटका दिला. या केळी उत्पादकांनी विमा काढलेला असून नुकसानभरपाईच्या अपेक्षेने रविवारी शेकडो शेतकऱ्यांनी ई-मेलद्वारे विमा कंपनीला याबाबत माहिती दिली आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्याची मागणीसुद्धा या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या भागातील १२ ते १५ गावांत केळीचे नुकसान झालेले आहे.

मी सहा हजार केळी रोपांची लागवड केली होती. आधी उष्णतेमुळे केळीचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून वाचलेली बाग शनिवारी झालेल्या वादळात १०० टक्के उद्ध्वस्त झाली आहे. 
-विकास देशमुख, केळी उत्पादक, पणज, जि. अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banana crop damage due to stormy rains