महाराष्ट्र राज्य ‘राज्य-सर्प’ घोषित करण्याची होतेय मागणी

Bandu Dhotre says declare Maharashtra a State Snake
Bandu Dhotre says declare Maharashtra a State Snake

नागपूर  ः राज्य-प्राणी, पक्षी, वृक्ष, फूल व फुलपाखरू याप्रमाणेच महाराष्ट्र राज्याने ‘राज्य-सर्प’ घोषित करावे, अशी मागणी राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोतरे यांनी केली आहे. राज्याचे वनमंत्री व प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना त्यांनी याविषयी निवेदन पाठविले आहे.

निसर्गात सापाचे सुद्धा महत्त्व आहे. शहरी आणि ग्रामीण भागात सापासोबत मानवाचा नेहमीच संपर्क येतो. सापाबद्दल भीती, श्रद्धा-अंधश्रद्धा, देवत्व, रूढी परंपरा आदी जुळलेल्या आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत वन्यप्राणी, पक्ष्यांसोबतच सापांनाही संरक्षण दिले आहे. साप अन्नसाखळीत महत्त्वपूर्ण घटक आहे. भारतीय अजगर, भारतीय अंडीखाऊ साप यासारखी वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत अनुसूची क्रमांक एकमध्ये समावेश आहे. 

याच अनुसूची क्रमांक एकमध्ये असणारे संकटग्रस्त अनेक वन्यप्राण्यांइतकेच सापांना महत्त्व आहे. अन्य सर्वच प्रजातीच्या सापांना या कायद्यांतर्गत वेगवेगळ्या अनुसूचित संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळेच वनअधिकारी, सापावर कार्य करणारे तज्ज्ञ व अशासकीय सदस्यांची एक समिती तयार करावी. त्यांचे अभिप्राय घेऊन कोणता साप ‘राज्यसर्प’ म्हणून घोषित करावा यावर निर्णय घेता  येणे सोपे होणार आहे. 

महाराष्ट्रात वेगवेगळ्या अधिवासात अनेक प्रकारची विषारी-बिनविषारी तसेच दुर्मीळ-अतिदुर्मिळ  तसेच संकटग्रस्त  साप आहेत. त्यांना संरक्षण आणि नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. 

पर्यावरणातील महत्त्व

जगात आढळणाऱ्या २९०० प्रजातीच्या सापांपैकी जवळपास २७० साप भारतात आढळतात. पृथ्वीवरील सर्वात आधीपासून असलेला साप हा एक प्राणी आहे. निसर्गात परिसंस्थेच्या अनुषंगाने अन्नसाखळीच्या मध्यम फळीतील भक्षक असल्याने या सापांचा नाश झाल्यास सर्पाचे भक्ष्य असलेले जिवांची भरमसाठ वाढ होईल तर, साप ज्यांचे खाद्य आहे त्यांच्यात संघर्ष निर्माण होईल. साप हे नैसर्गिक कीटक नियंत्रकांचे कार्य करीत असतात.

विषारी साप आणि सर्पदंश

भारतात आढळणारे प्रमुख विषारी साप नाग, मण्यार, घोणस व फुरसे हे चार साप आहेत. दरवर्षी भारतात सरासरी ४६ हजार लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. जागतिक स्तरावर १९ सप्टेंबर हा दिवस जागतिक सर्पदंश जनजागृती दिवस’ म्हणून साजरा केला जातो. राज्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात सर्पदंश होऊन मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

..तर ठरेल पहिले राज्य

राज्यात सापाबाबत व्यापक जनजागृती व संवर्धनासाठी वनविभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे प्राणी, पक्षी व फुलपाखरू प्रमाणेच ‘राज्यसर्प’ सुध्दा असावे. त्याकरिता वनविभागास सुचित्त करून याबाबत योग्य माहिती घेऊन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्याची वनमंत्री यांच्याकडे विनंती केली आहे. असे झाल्यास ‘राज्यसर्प’ घोषित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल. 

संपादन : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com