चुडियोंकी ठणक कम हो गई...साहब

केवल जीवनतारे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नागपूर - बांगड्या या विवाहित महिलांसाठी पवित्र आणि पारंपरिक असा दागिना आहे. लग्नानंतर महिलांचे हात बांगड्यानी भरलेले असतात. बांगड्या केवळ त्यांच्या हातचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर प्रमुख अलंकार आहे. हिरव्या बांगड्या सौभाग्याचे प्रतीक आहे. आजही हिरव्या बांगड्यांनाच लग्नसराईत मागणी असते. नागपूरच्या मोमिनपुरा हंसापुरीत बांगड्यांची बाजारपेठ असून नेहमीच फुललेली दिसत होती. मात्र, अलीकडे येथील बांगड्यांची दुकाने ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात, हा बांगड्यांचा हा बाजार अर्ध्यावर आला आहे.

नागपूर - बांगड्या या विवाहित महिलांसाठी पवित्र आणि पारंपरिक असा दागिना आहे. लग्नानंतर महिलांचे हात बांगड्यानी भरलेले असतात. बांगड्या केवळ त्यांच्या हातचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर प्रमुख अलंकार आहे. हिरव्या बांगड्या सौभाग्याचे प्रतीक आहे. आजही हिरव्या बांगड्यांनाच लग्नसराईत मागणी असते. नागपूरच्या मोमिनपुरा हंसापुरीत बांगड्यांची बाजारपेठ असून नेहमीच फुललेली दिसत होती. मात्र, अलीकडे येथील बांगड्यांची दुकाने ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात, हा बांगड्यांचा हा बाजार अर्ध्यावर आला आहे. बांगडी दुकानदारांच्या भाषेत त्यांची व्यथा सांगायचे झाल्यास ‘चुडियोंकी ठणक अभि कम हो गई...’ साब म्हणून दिवसभर गल्ल्यावर बसून दिसतात. हातातील मोबाईलवर मात्र त्यांची बोटं तेवढी थुईथुई नाचताना दिसतात.  

स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून हंसापुरी जुना भंडारा रोडवर बांगड्यांचा व्यवसाय चालत होता. १९३१ मध्ये बंगाली बाबू (सतीश चंद्र) यांच्यासह अनेक दुकाने होती. अंत्यत कमी किमतीत हव्या त्या डिझाईनच्या रंगीबेरंगी बांगड्या, आपापल्या मापानुसार येथील विक्रेते पटकन काढून देतात. अगदी दहा रुपयांच्या बांगडीपासून दोन अडीच हजारांचे बांगड्यांचे सेटसुद्धा ते बनवून दिले जातात. विशेष असे की, हंसापुरीतील होलसेल बांगड्यांच्या दुकानातूनच शहरातील सदर, धरमपेठ, बर्डी, इतवारी, महालपासून तर कामठीपर्यंत व्यवसाय चालतो. 

डोक्‍यावर बांगड्यांचा भारा वाहून लग्नघरात बांगड्या भरून देणाऱ्या महिला याच दुकानातून बांगड्या उधारीवर नेत असत, दर वर्षाला १० ते १५ लाखांपेक्षा अधिक उलाढाल एका दुकानाची होती. अशी ३० ते ४० वर दुकाने होती. परंतु, काळाच्या ओघात काचेच्या बांगड्यांच्या व्यवसायावर महागाईने तसेच बदलत्या फॅशनमुळे संकट आले. 

हस्तीदंतापासून, लाखापासून तर पितळेच्या, प्लॅस्टिकच्या बांगड्या बाजारात दिसतात खऱ्या परंतु यांना अलीकडे मागणी कमी झाली आहे. विदर्भासहित राज्याच्या सीमावर्ती भागातील सिवनी, मंडला, छिंदवाडा, बैतुल येथूनच मागणी होत असे.

टिमकीतील नक्षीकामही थांबले 
काही काळापूर्वी साडीच्या रंगाला मॅच होईल, अशा काचेच्या बांगड्यांची मागणी वाढली होती. टिमकी परिसरात बांगड्यांवर नक्षीकाम करण्याचा मोठा व्यवसाय घरोघरी सुरू झाला होता. परंतु, आता नागपुरातील चिल्लर दुकानदारांनी फिरोजाबादेतील बांगड्यांच्या कारखान्याकडे ऑर्डर नोंदविण्यास सुरू केल्याने हे नक्षीकाम थांबले. हा व्यवसाय बुडाल्याची वस्तुस्थिती हंसापुरीतील जागृती एण्ड को.चे मालक रितेश यादव (चौधरी) यांनी कथन केली. हंसापुरीतील बांगडी बाजाराची उलाढाल दोन कोटींवर असल्याचे विविध बांगडी दुकानदारांशी केलेल्या चर्चेतून पुढे आले.   

दशकापूर्वी बांगड्यांचा व्यवसाय नागपुरात चांगला चालत होता. बांगडी व्यवसायात गरीब  वर्गातील युवक तसेच महिला मोठ्या प्रमाणात गुंतल्या होत्या. विशेष असे की, गल्लीबोळात फिरून बांगड्या विकणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. लग्नसराईत लग्नघरी व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या पाच ते सात हजारांवर होती, परंतु आता महिलांनी बांगडी व्यवसायाकडे पाठ फिरवली. लग्नसराईतील दोन तीन महिने तेवढे हिरव्या बांगड्यांना मागणी असते. 
- रितेश यादव (चौधरी), बांगडी व्यावसायिक, हंसापुरी.

Web Title: Bangal Business Issue