अकोला- बँक ऑफ महाराष्ट्राची दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट

मनोज भिवगडे
शुक्रवार, 18 मे 2018

अकोला- विदर्भात १९७९ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे विदर्भातील दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. अकोला येथील कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर येथील कार्यालय नागपूर कार्यालयात हलविण्यात येणार आहे.

अकोला- विदर्भात १९७९ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे विदर्भातील दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. अकोला येथील कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर येथील कार्यालय नागपूर कार्यालयात हलविण्यात येणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाची ता. ५ मे २०१८ रोजी एक बैठक पुण्यात घेण्यात आली. त्यानंतर ता. ७ मे रोजी विश्लेषणात्मक बैठक झाली. यात व्यवस्थापनाने यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत राज्यातील अकोला, चंद्रपूर, लातूर, सातारा, रत्नागिरी आणि अहमदनगर ही सहा विभागीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खर्च कमी करण्याच्या नावाखाली ही कार्यालये बंद केली जात आहेत. ही प्रादेशिक कार्यालये मराठवाडा, विदर्भ व कोकण या मागास भागात येतात. बँक राष्ट्रीयीकरणाचा एक उद्देश मागास भागाचा विकास हा होता. या पाश्र्वभूमीवर ही कार्यालये सुरू करण्यात आली व आता ते खर्चाचे कारण करून बंद केली जात आहेत. प्रादेशिक कार्यालये बंद झाली तर त्या विभागातील शाखांवरील नियंत्रण कमी होणार आहे.

विभाजीत कार्यालयात मूळ कार्यालय
अकोला येथे १९७९ मध्ये बँकेने विभागीय कार्यालय सुरू केले होते. त्यावेळी अमरावती जिल्हा या कार्यालयाशी संलग्न होता. कालांतराने अकोला कार्यालयाचे विभाजन होऊन अमरावती येथे विभागीय कार्यालय सुरू केले. आता या विभाजीत कार्यालयात मूळ कार्यालय सामावून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अकोला येथे बँकेचे स्वःताच्या इमारतीत कार्यालय आहे. अमरावतीचे कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे.    

बुलडाणा जिल्हा जळगावला जोडणार
अकोला विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्याला जळगाव कार्यालयाशी जोडण्यात येणार आहे. तसे झाल्यास बुलडाणा जिल्ह्यातील २३ शाखांपैकी अनेक तालुक्यांमधील शाखा विभागीय कार्यालयापासून १५० ते २०० किलोमीटर लांब होणार आहेत. अशावेळी या शाखांवर बँकेचे नियंत्रण कसे राहील, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

करंसी चेस्टचे काय? 
अकोला कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्राची करंसी चेस्ट आहे. अमरावती कार्यालयात नाही. अकोल्याचे कार्यालय अमरावतीला पाठविल्यास करंसी चेस्टही अमरावती कार्यालयात स्थलांतरीत केले जाऊ शकते. त्यामुळे अकोल्यातील बँक ग्राहकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

कर्ज प्रकरणांच्या मंजुरीला होईल विलंब
अकोला जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. अकोला झोनमध्ये १ लाख ३ हजार कृषी खाते आहेत. त्यातून ७३५ कोटी रुपये कर्ज वितरित होते. शेतकरी कर्जमाफीत ६० हजार कर्जखाती पात्र ठरली. ज्या माध्यमातून १, ८५०० खात्यातून ११० कोटी वितरित करण्यात आले. झोन कार्यालयातूनच कर्ज खात्यांचे नियंत्रण होते. कार्यालय अमरावतीला गेल्यास त्यावर परिणाम होईल. 

झोन कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाबाबत आम्ही व्यवस्थापनासोबत बोलणार आहोत. संघटनेच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीतही हा विषय हाताळू. कार्यालय बंद करणे ग्राहक व बँकेच्या हिताचे नाही, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करू. 
- श्‍याम माईनकर, विदर्भ अध्यक्ष , बँक कर्मचारी संघटना

अकोला झोन कार्यालयाचा शाखा विस्तार
अकोला - १६
बुलडाणा - २३
वाशीम - ०९
एकूण - ४८ 

अमरावती झोन कार्यालयाचा शाखा विस्तार
अमरावती - ४१ 
वर्धा - १३ 
एकूण -  ५४

नागपूर झोन कार्यालयाचा शाखा विस्तार
नागपूर - ४४ 
गोंदिया - १० 
भंडारा - ११ 
एकूण - ६५ 

चंद्रपूर झोन कार्यालयाचा शाखा विस्तार
चंद्रपूर - २७ 
यवतमाळ - १९ 
गडचिरोली - १२
एकूण - ५८ 

Web Title: Bank of Maharashtra's two divisional offices going to closed