शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मॅनेजरला नागपुरातून अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

लग्नासाठी आला होता नागपुरात 
राजेश हिवसे हा मूळचा वर्धा जिल्ह्यातील आहे. तो नातेवाइकाच्या लग्नासाठी रविवारी नागपुरात आला होता. लग्न आटोपल्यानंतर तो रेशीमबागमध्ये राहणाऱ्या एका नातेवाइकाच्या घरात दडून बसला होता. मात्र, नागपूर पोलिस आणि मलकापूर पोलिसांनी सायबर क्राइमच्या मदतीने त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या अटकेची सक्‍करदरा पोलिस ठाण्यात नोंद करीत ताबडतोब मलकापूरला रवाना केले.

नागपूर - पीककर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील बॅंक अधिकाऱ्याला मलकापूर पोलिसांनी रेशीमबागेतून आज (ता. २५) अटक केली. राजेश हिवसे असे आरोपी बॅंक अधिकाऱ्याचे नाव असून तो दाताळा येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया येथे कार्यरत होता. 

राजेश हिवसे याने पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. या प्रकरणी शेतकऱ्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर बॅंक अधिकारी आणि शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला. हिवसेला सहकार्य करणाऱ्या शिपायाला मलकापूर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेश हिवसे हा पसार झाला होता. त्याचा शोध मलकापूर पोलिस राज्यभरात घेत होते. त्यासाठी सहा पथके स्थापन करण्यात आली. अखेर मलकापूर पोलिसांनी रेशीमबाग परिसरातून या अधिकाऱ्याच्या मुसक्‍या आवळल्या. त्याला उद्या मलकापूर न्यायालयात हजर करण्यात येईल. 

असे आहे प्रकरण...
पीककर्जासाठी बॅंक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला. महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. तिथे बॅंक मॅनेजरने कागदपत्रांची तपासणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. त्यावर संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. नंतर मॅनेजरने शेतकरी पत्नीसोबत अश्‍लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली. मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळे पॅकेजही देण्यात येईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठवला.

Web Title: Bank officer arrested in nagpur