बॅंका ओव्हरफ्लो!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पैसे जमा करण्यासाठी रांगा - पाचशे-हजाराच्या नोटा बदलण्याची घाई

पैसे जमा करण्यासाठी रांगा - पाचशे-हजाराच्या नोटा बदलण्याची घाई

नागपूर - जवळपास ३६ तास नागपूरकरांचा श्‍वास रोखून धरणाऱ्या बॅंका आज (गुरुवार) उघडल्या आणि हजारो नागरिकांची एकच गर्दी झाली. बॅंका सुरू होण्याच्या एक तास आधीच नागरिकांनी रांगा लावल्या. आपल्याजवळ असलेल्या पाचशे-हजाराच्या नोटा कधी एकदा खात्यात जमा करतो, असे सर्वांना झाले होते. शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये अशी स्थिती असल्याने अवघ्या तीन तासांमध्ये बॅंका ‘ओव्हरफ्लो’ झाल्या. दुपारी तीनपर्यंत अनेक बॅंकांमधील रोख संपल्याने नोटा बदलून मिळण्याची आशा संपुष्टात आली. मात्र खात्यात पैसे जमा करणाऱ्यांनी सायंकाळपर्यंत हिंमत सोडली नाही. दोन हजारांची नोट हाती लागल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. काहींनी तर नवीन नोटसोबत सेल्फीदेखील काढले. पेट्रोल पंपावरील गर्दी आज काही प्रमाणात ओसरली होती. मात्र, सुट्या नोटांचा वांदा कायम होता. एकूणच नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी आणखी काही दिवस गोंधळ कायम असेल.

मृत्यूनंतरही वेदना

जगाचा निरोप घेताना कुणाचेही कर्ज डोक्‍यावर राहू नये, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु, ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटा बंद झाल्याने या इच्छेवर पांघरूण ओढवले गेले आहे. कारण घरातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे शोकव्याप्त आप्तेष्टांना अंत्यसंस्काराचे साहित्य आणण्यासाठीही नातेवाईक व मित्रांकडून तात्पुरते उसने घ्यावे लागत आहे. महाल परिसरात अंत्यसंस्काराच्या विधीला लागणारे साहित्य घेण्यासाठी शोकाकूल नातलग आले होते. पूर्वीच शक्‍यतेवढी चिल्लर त्यांनी सोबत आणली. परंतु, ते कमी पडत असल्याने पाचशेच्या जुन्या नोटा घेऊन साहित्य देण्याची विनवणी विक्रेत्याला करीत होते. परंतु, दुकानदाराने असमर्थता दर्शविली. अखेर बाजारातून बराच वेळ प्रयत्न करून सुटे मिळविल्यानंतरच त्यांना साहित्य मिळाले. खिशात आणि बॅंकेत पैसे असूनही गरजेच्या वेळी त्याचा उपयोग नसल्याची खंत नातेवाइकापैकी एकाने बोलून दाखविली. दु:ख आवेगातही सरकारचा मानस चांगला असल्याची पावती देत कोणतीही प्रतिक्रिया नोंदविण्यास नातेवाइकांनी नकार दिला.

एका लग्नाची ‘अडली’ गोष्ट

घरी लग्नकार्य म्हटल्यावर होणारी धावपळ नवी नाही. मात्र, अचानक झालेल्या निर्णयामुळे लग्नघरातील वातावरण चिंतामय झाले आहे. अनेकांची देणी-घेणी आता धनादेश किंवा पंधरा दिवसांच्या मुदतीवर करण्यात येत आहे. गौरव बांद्रे या तरुणाचे लग्न येत्या शनिवारी (ता. १२) आहे. परवापर्यंत अत्यंत उत्साहात मंडप, कॅटरर्स आदींचे ॲडव्हान्स पेमेंट सुरू होते. मात्र, मोदींच्या घोषणेनंतर लग्नासाठी काढून ठेवलेली रक्कम आता खर्च करणे अवघड झाले आहे.

एसएनडीएलची ग्राहकांना सुविधा
एसएनडीएलने वीज ग्राहकांकडून पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारणे सुरू केले. ग्राहकांची सुविधा लक्षात घेऊन एसएनडीएलने शहरातील १८ वीजबिल भरणा केंद्र गुरुवारी रात्री ८.३० ते शुक्रवारी रात्री १२ पर्यंत सुरू ठेवले जाणार असल्याचे जाहीर केले. परंतु, बिलाचा भरणा करताना केवळ आजपर्यंतच्या देशकाची राशी भरता येईल. अग्रीम राशी भरता येणार नाही. ग्राहकांना शासकीय ओळखपत्राची झेरॉक्‍स केंद्रावर देणे आवश्‍यक आहे.

पोस्टात फक्त ‘इनकमिंग’!
स्टेट बॅंकेने अद्याप नव्या नोटा दिल्या नाहीत. त्यांच्या धोरणांप्रमाणे जीपीओच्या खात्यात फक्त १० हजार रुपये देण्याचे आदेश आहेत. परंतु, आवश्‍यकता जास्त आहे. परिणामी खातेधारकांना नोट बदलून देण्यात आलेल्या नाहीत. सकाळपासून खोतधारक पाचशे आणि हजारच्या नोट डिपॉजिट करायला येत आहेत. मात्र, जोपर्यंत स्टेट बॅंकेतून आवश्‍यक तेवढी रक्कम येत नाही तेव्हापर्यंत जीपीओतून नोट बदलून मिळणार नाही. दोन दिवसांचा कालावधी उलटूनही पोस्टात पैसा जमा झाला नसल्याने ग्राहकांना परत जावे लागत आहे. गुरुवारी सकाळी फक्त दोन तास गर्दी होती. त्यानंतर पैसा उपलब्ध नसल्यामुळे बारानंतर पोस्ट ऑफिसमध्ये कमालीची शांतता होती. ‘स्टेट बॅंकेने लवकरात लवकर पैसा द्यावा यासाठी डाक विभागाचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत,’ असे जीपीओचे सिनियर पोस्टमास्टर मोहन निकम यांनी सांगितले. खातेधारकांना मात्र पाचशे-हजारच्या नोटांच्या बदल्यात शंभर, पन्नास आणि वीसच्या नोट दिल्या जात आहेत. सकाळपासून ग्राहक चौकशीसाठी येत आहेत. मात्र, आम्हाला नोट बदलून देणे शक्‍य नाही, असे शंकरनगर येथील पोस्टमास्टर सी. पी. सगदेव यांनी सांगितले.
 

मंदिरातली गर्दी वाढली

शहरातील मुख्य मंदिरांसह गल्लीबोळातील मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले. भाविकांप्रमाणेच मंदिरातील दानपेटीतील रक्कमदेखील वाढल्याचे अनेक मंदिर विश्‍वस्तांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. दानपेटी उघडल्यानंतर त्यामध्ये पाचशे-हजारच्या नोटा निघणार की काय, अशी देखील शंका व्यक्त करण्यात येत आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १०७८ मध्ये हजारची नोट बंद केली होती. तेव्हा अनेक मंदिरातील दानपेट्या हजार रुपयाच्या नोटेने भरलेल्या होत्या. अनेकांनी स्वत:हून हजारच्या नोटा मंदिराच्या पायरीवर ठेवल्याच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला आहे. 

‘प्रभू’नामाचा वापर

नागपूर - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पत्राचा वापर करून व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करणे एका प्रवाशाला चांगलेच भोवले. त्याला गुरुवारी रात्री नागपूर स्थानकावर संशयाच्या आधारावर ताब्यात घेण्यात आले. अनिल नारायण चौबे असे प्रवाशाचे नाव असून, तो मुंबईतील रहिवासी आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे नागपूर - मुंबई दुरांतो एक्‍स्प्रेस होमप्लेटफॉर्मवर लागली. ८.४० वाजताच्या सुमारास रेल्वेचा वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा दलाने दुरांतो एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांचे तिकीट तपासले. या तपासणी तथकात रेल्वे सुरक्षा दलाचे दिलीप कुमार, वाणिज्य विभागाचे एसीएम राव आणि सीटीआई राजेश्वर राव यांचा समावेश होता. त्यांनी प्लॅटफार्म क्रमांक आठवर उभ्या प्रवाशांचेही तिकीट तपासले. अनिलकडे विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. संशयाच्या आधारावर त्याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्याकडे त्याच दिवशीचे दुरांतो एक्‍स्प्रेसचे पीएनआर ८२५ - ३०११४९४ क्रमांक असलेले थर्ड एसीचे तिकीट आढळले. चौकशीत त्याने हे तिकीट मुंबईच्याच राजू सोनी याच्याकडून व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म केल्याचे सांगितले. त्याच्याकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाचे पत्रही आढळले. यामुळे रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त कारवाई तयार करून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: bank overflow