३० रुपयांसाठी बारमालकाचे अपहरण करून बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नागपूर - बिलाच्या पैशावरून वाद झाल्याने पाचपावलीतील एका बारमालकाचे अपहरण करून त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. परमानंद तलरेजा असे अपहृत बारमालकाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी लगेच आरोपींचा शोध घेऊन चौघांना अटक करून त्यांच्याकडून तीन तलवारी आणि दोन चाकू जप्त केले.

नागपूर - बिलाच्या पैशावरून वाद झाल्याने पाचपावलीतील एका बारमालकाचे अपहरण करून त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. परमानंद तलरेजा असे अपहृत बारमालकाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी लगेच आरोपींचा शोध घेऊन चौघांना अटक करून त्यांच्याकडून तीन तलवारी आणि दोन चाकू जप्त केले.

प्रतीक परमानंद तलरेजा (वय २७, रा. वैशालीनगर) यांचा कमाल चौकात कॅफे रूफ बार आहे. रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास प्रतीक यांचे वडील परमानंद तलरेजा हे बारमध्ये काउंटरवर बसले होते. दरम्यान, आरोपी अजय चिंचखेडे, मोनू समुद्रे, सौरभ तायवाडे आणि आकाश नागुलकर हे बारमध्ये आले. त्यांनी दारू पिल्यानंतर बिल देण्यावरून परमानंद यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना मारहाण केली. त्यांना बळजबरीने पकडून ओढून गाडीवर बसवून बाळाभाऊ पेठच्या मैदानावर नेले. तेथे पुन्हा लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून तलवारीने सपासप वार केले. काही मिनिटांतच प्रतीक तलरेजा आणि बारमधील नोकरांनी धाव घेतली. त्यामुळे आरोपी पळून गेले. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या परमानंद यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

३० रुपयांवरून झाला वाद 
आरोपींनी दारू ढोसल्यानंतर बिलामध्ये ३० रुपये कमी दिले. तलरेजा यांनी पैसे कमी असल्याचे सांगितले. त्यानंतर चौघांनीही खिशे चाचपले, परंतु पैसे नव्हते. त्यामुळे उद्या देतो असे सांगितले. मात्र, मालक आणि गार्डने त्या आरोपींना शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी तलरेजा यांना मारहाण केली. 

गस्त झाली सुस्त
पोलिस आयुक्‍तांनी बिट सिस्टिम राबवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. रात्रगस्तीवर भर देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची प्रयत्न केला. मात्र, पाचपावली पोलिसांनी पोलिस आयुक्‍तांच्या आदेशाला हरताळ फासला आहे. गस्तीवर असलेले पोलिस रात्री झोपा काढण्यात गुंग असल्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे बोलले जाते.

ढाबे, बार पहाटेपर्यंत सुरू 
पाचपावली परिसरात पहाटपर्यंत बार, पानठेले, हॉटेल्स आणि ढाबे सुरू असतात. पोलिसांसोबत असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे हा सर्व प्रकार सुरू आहे. अनेक वेळा पोलिस कर्मचारीच ढाब्यावर येऊन ऑर्डर देऊन ‘बैठक’ लावतात. पोलिसांचीच अशी भूमिका असल्यामुळे ढाबे आणि बारमध्ये गुन्हेगारांच्या बैठकी वाढल्या आहेत. यासाठी पोलिस जबाबदार असल्याची चर्चा आहे.

Web Title: bar owner kidnapping beating crime