रेल्वेस्थानकावरील बॅटरी कारला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

प्रवाशांना करावी लागणार पायपीट - अपंग, वृद्धांना फटका

नागपूर - रेल्वेस्थानकाच्या मुख्यद्वारापासून फलाटापर्यंत पोहोचवून देणारी बॅटरी कार सेवा सोमवारपासून तडकाफडकी बंद करण्यात आली आहे. यामुळे अपंग, वृद्ध, रुग्णांना फलाटापर्यंत पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. 

प्रवाशांना करावी लागणार पायपीट - अपंग, वृद्धांना फटका

नागपूर - रेल्वेस्थानकाच्या मुख्यद्वारापासून फलाटापर्यंत पोहोचवून देणारी बॅटरी कार सेवा सोमवारपासून तडकाफडकी बंद करण्यात आली आहे. यामुळे अपंग, वृद्ध, रुग्णांना फलाटापर्यंत पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. 

नागपूर सिटीझन कन्सर्न संस्थेने काही वर्षांपूर्वी ही सेवा सुरू केली. संस्थेचे कपिल चांडक यांनी दोन बॅटरीकार उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रायोजक संस्थांकडून मिळणाऱ्या आर्थिक पाठबळातून ही सेवा संचालित करण्यात येत होती. अल्पावधीतच या सेवेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नागपूरच्या पावलावर पाऊल टाकत अन्य रेल्वेस्थानकावरही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. पण, प्रायोजक कंपन्यांकडून मिळणारे सहकार्यच बंद झाले. शिवाय कोणतेही दानदाते सहकार्यासाठी पुढे येत नसल्याने नागपूर स्थानकावरीलच सेवा बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे. 

चांडक यांनी १२ मे रोजीच वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापकांच्या नावे पत्र लिहून सेवा बंद करण्याचा निर्णय कळविला होता. पण, रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली करण्यात आल्या नाही. परिणामी सोमवारपासून सेवा बंद करण्यात आली. प्रवाशांच्या सेवेत असलेल्या दोन बॅटरी कारपैकी एक नादुरुस्त झाल्यानंतर माघारी बोलावून घेण्यात आली होती. दुसरी कारही आजच परत मागवून घेण्यात आली. सोमवारी दुपारपासूनच ही सेवा बंद झाली. पण, प्रवाशांना याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. यामुळे प्रवाशांकडून सातत्याने बॅटरी कारबाबत विचारणा करण्यात येत होती. दुसरीकडे बॅटरी कार बंद होताच प्रवाशांना स्टेचरवरून ओढून नेण्यासाठी काही कुलींनी जादा रकमेची वसुली सुरू केली आहे.

प्रशासनाची अनास्था
रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. यानंतरही काही काळापूर्वी ही लोकोपयोगी सेवा बंद करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले होते. लोकांच्या रेट्यानंतर सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. आता चार दिवसांपूर्वी सेवा बंद करण्याची नोटीस मिळूनही प्रशासनाने कोणतीच पावले उचलली नाही. या प्रकाराने प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Web Title: battery car stop on railway station