नागपूर शहर कॉंग्रेसमध्ये आरपारची लढाई?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांची वेगळी चूल?
नागपूर - नागपूर शहर कॉंग्रेस समितीतील गटबाजी शमण्याची कोणतीही चिन्हे नसून, शहरातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये आता आरपारची लढाई होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांची वेगळी चूल?
नागपूर - नागपूर शहर कॉंग्रेस समितीतील गटबाजी शमण्याची कोणतीही चिन्हे नसून, शहरातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये आता आरपारची लढाई होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नागपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केल्यापासून कॉंग्रेसमध्ये गटबाजीला सुरुवात झाली. माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांनी ठाकरे यांनी केलेल्या शहर कार्यकारिणीला आक्षेप घेतला आहे. नितीन राऊत यांच्या समर्थकांनी कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविले आहेत. प्रदेशाध्यक्षांनी हे राजीनामे स्वीकारलेले नाहीत. तसेच यावरून ठाकरे यांना कोणतीही कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले नाहीत.
राऊत व चतुर्वेदी समर्थक नागपूर शहर कॉंग्रेस समितीच्या कोणत्याही बैठकांनाही हजर राहत नाहीत. सलग तीन बैठकांना हजर न राहणाऱ्या सदस्यांना बरखास्त करण्याचा ठराव नागपूर शहर कॉंग्रेस समितीने केला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नागपूर शहर कॉंग्रेस समितीमध्ये गटबाजी उफाळून आल्याने शहर कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची शक्‍यता आहे. राऊत व चतुर्वेदी समर्थकांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यास वेगळी आघाडी करून निवडणूक लढविण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे समजते.

राऊत व चतुर्वेदी गटाच्या 23 कार्यकारिणी सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय शहर कॉंग्रेसने घेतला आहे. शहर कार्यकारिणीतील सदस्यांना बरखास्त करण्याचा अधिकार प्रदेश कॉंग्रेस समितीला आहे.

शिस्तभंग कारवाईची शिफारस
नागपूर शहर कॉंग्रेस समितीच्या बैठकांना हजर न राहणाऱ्या कार्यकारिणी सदस्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. यावर नागपूर शहर कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावयाचा आहे. यात जवळपास 23 कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.
- डॉ. गजराज हटेवार, सरचिटणीस, नागपूर शहर कॉंग्रेस समिती

Web Title: Battle through Congress in the city of Nagpur