सावधान! अमरावतीत बोगस डॉक्‍टरचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ...तीन दिवसांची पोलिस कोठडी

file photo
file photo

अमरावती : कथित एमबीबीएस, एमडी असे फलक लावून मागील दोन वर्षांपासून नागरिकांवर विविध आजारासाठी उपचार करून आरोग्याशी खेळणाऱ्या डॉक्‍टरविरुद्ध शनिवारी (ता. 4) रुग्णाच्या नातेवाइकांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्या कथित डॉक्‍टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. अविनाश वसंत डबले (वय 38 रा. भवते ले-आउट, अमरावती) असे या बोगस डॉक्‍टरचे नाव आहे. नितीन रमेश गोंडाणे (वय 27, रा. उत्तमनगर, अमरावती) यांनी ही तक्रार नोंदवली आहे.

मागील दोन वर्षांपासून, अविनाश वसंत डबले याने शांतिनगर, बेनोडा परिसरात सर्वज्ञ हेल्थकेअर फाउंडेशन या नावाने आठ बेडचे क्‍लिनिक सुरू केले. नितीन यांचे वडील रमेश गोंडाणे हे उच्च रक्तदाबावर उपचार घेत होते. काही दिवसांपासून पूजा गोंडाणे यांच्यावरही डबले याच्या रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. काही दिवसांपासून त्याने बेनोडा येथील क्‍लिनिक बंद करून किरणनगर नंबर 2 येथे दुसरे आठ बेडचे क्‍लिनिक सुरू केले.

वैद्यकीय शिक्षण घेतलेले नितीन गोंडाणे हे संशय आल्यामुळे कथित डॉक्‍टर अविनाश डबले याच्या रुग्णालयात पोहोचले. त्याठिकाणी डबले याच्या नावाचा मोठा फलक, रुग्णालयात डॉक्‍टर वापरतात तशा फाइल्स, औषधी लिहिण्यासाठी लेटरपॅड, शिक्के आढळून आले. डबले याने सन 2004 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून शिक्षण झाल्याचे गोंडाणे यांना सांगितले.

संशय आल्याने केली तक्रार

नितीन गोंडाणे यांच्या भावाचेसुद्धा नागपूर वैद्यकीय महाविद्यालय येथेच शिक्षण झाले. परंतु ते अमरावतीच्या अविनाश डबले याला ओळखत नसल्याचे सांगितले. मागील पंधरा दिवसांपासून नितीन गोंडाणे यांनी डबले याच्या हालचालीवर वॉच ठेवला. संशय आल्याने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार केल्यामुळे अविनाश डबलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. डबले यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला मंगळवार(ता. सात)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वैद्यकीय व्यवसायाला परवानाच नाही

डॉ. अविनाश डबले याच्याजवळ सर्वज्ञ हेल्थकेअर फाउंडेशन नावाने वैद्यकीय व्यवसाय चालविण्यासाठी आवश्‍यक असलेला परवाना नाही. डबले याला पोलिसांनी पुरावे सादर करण्यास वेळ दिला; परंतु दस्तऐवज सादर करू शकला नाही.

आता अहवालाची वाट
गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्यासंदर्भात माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आली. त्यांचा अहवाल आल्यानंतर आवश्‍यकता भासल्यास भांदविच्या कलमांची तीव्रता वाढविली जाईल.
- बालाजी लालपालवाले, पोलिस उपनिरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com