सावधान! बॅंकेतून लोन देण्यासाठी फोन आलाय...

file photo
file photo

नागपूर :  "हॅलो...मी बॅंकेतून बोलते...तुम्हाला बॅंकेतून लोन हवे का?.. अगदी कमी व्याजदर आणि तासाभरात लोन मंजूर करून देते...' असा मधुर आवाजात फोन आल्यास सावधान..! कारण हा हनीट्रॅप आहे... गोड बोलून रजिस्ट्रेशनच्या नावावर शुल्क उकळतात आणि नंतर हप्ता भरण्याच्या नावावर संपूर्ण रक्‍कम ही सायबर टोळी हडप करते. अशा अनेक घटना नागपुरात उघडकीस आल्या आहेत, त्यामुळे नागरिकांनी स्वतः सजग राहण्याचे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे. नागपूर सायबर क्राइम सेलमध्ये अनेक तक्रारींचा लोंढा आहे. ज्यामध्ये विमा कंपनी किंवा बॅंकेतून लोन देण्याच्या नावावर गंडविल्या गेल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. बजाज फायनान्स या नामांकित कंपनीच्या नावावर अनेकांनी छोटेखानी दुकाने उघडून कॉल सेंटर सुरू केले आहे. 5 ते 8 हजार रुपये वेतन देऊन युवतींकडून "फेक कॉल' केल्या जातात. यामध्ये विमा काढून देण्याच्या नावाखाली तसेच बॅंकेत खाते उघडल्यानंतर लोन देण्याच्या नावाखाली ग्राहकांना जाळ्यात ओढल्या जाते. पैशाची गरज पाहून आणि आर्थिक स्थिती पाहून खाते उघडण्याच्या नावावर काही ठराविक रक्‍कम भरण्यासाठी दबाव टाकला जातो. कर्ज मिळणार आणि निकड भागणार या आशेवर गरजवंत सांगितलेली रक्‍कम दिलेल्या खाते क्रमांकावर टाकतो. त्यानंतर प्रोसेसिंग शुल्क आणि "डाक्‍युमेंटेशन चार्ज' म्हणून काही रक्‍कम पुन्हा खात्यात टाकण्यास सांगतात. अशाप्रकारे 30 ते 40 हजार रुपये उकळले जातात. त्यानंतर मात्र फोन बंद करून ठेवणे किंवा टोलवाटोलवीची उत्तरे ग्राहकांना दिली जातात. काही दिवसांतच फसवणूक झाल्याचे लक्षात येते. परंतु तोपर्यंत बराच वेळ झालेला असतो. अनेकांचे फेसबुकवर अकाउंट असते. फेसबुकवरील प्रोफाइलमध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकाचा डेटा म्हणून वापर करतात. अशा क्रमांकावर वारंवार कॉल करून त्यांना हेरले जाते. काहींना बॅंकेचे कर्ज तर काहींना कमी पैशात विमा काढून परताव्याची रक्‍कम लाखोंमध्ये सांगून गंडा घातला जातो.
कट रचून विश्‍वास संपादन
एखाद्या ग्राहकाने कर्ज किंवा विमा काढण्यासाठी होकार दिल्यास कट रचून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून ग्राहकाला फोन केला जातो. कुणी ब्रॅंच मॅनेजर, तर कुणी फायनान्स अधिकारी तर कुणी बॅंकेच्या कर्ज वाटप विभागातून बोलत असल्याचे सांगतात. त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर विश्‍वास बसतो. मात्र, एकदा विश्‍वास संपादन केल्यानंतर मोठी फसवणूक केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com