पत्नीला मारहाण : दारूच्या नशेत पेंचिसने उपटली नखे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

अमरावती : कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादात पतीने क्रुरतेचा कळस गाठत पत्नीला अमानुष मारहाण केली. यावेळी पतीने पत्नीला काठीने तर मारलेच, सोबत पेंचिसने हातापायाच्या बोटांची नखे उपटली व लोखंडाने शरीरावर चटके दिले. ही घटना राजना-काजना (ता. नांदगाव खंडेश्‍वर) येथे घडली. गंभीररीत्या जखमी झालेल्या सदर विवाहितेवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजना-काजना येथील शालिकराम रोडगे याचे 12 वर्षांपूर्वी पळसमंडळ येथील येथील तरुणीशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले, मुलगी, असे तीन अपत्य आहेत. शालिकरामला दारूचे व्यसन होते. तो नशेत नेहमी पत्नी व वडिलांनाही मारहाण करायचा. शनिवारी (ता. 24) दुपारी तीनच्या सुमारास शालिकरामने दारूच्या नशेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला काठीने मारहाण केली. त्यानंतर त्याने लोखंडी वस्तूने तिच्या शरीरावर चटके दिले. शालिकराम एवढ्यावरच थांबला नाही; तर, त्याने अत्याचाराची सीमा गाठत पेंचिसने पत्नीच्या हातापायाच्या बोटांची नखेही उपटली. यामुळे ती गंभीर जखमी झाली.
जखमी विवाहितेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी शालिकराम रोडगे याच्याविरुद्ध रविवारी (ता. 25) रात्री गुन्हा दाखल केला. शालिकराम नशेत वडिलांनाही मारहाण करायचा. त्याला कंटाळून ते मुलीकडे राहत होते, असे पोलिसांनी सांगितले.

डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शालिकरामविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटना गंभीर आहे. आवश्‍यक तपासानंतर त्याला अटक केली जाईल.
- सुरेंद्र अहिरकर,
पोलिस निरीक्षक, लोणी ठाणे.

तरीही उदारता...
इर्विन रुग्णालयात जखमी विवाहितेवर उपचार सुरू आहेत. तेथे ग्रामीण पोलिसांनी तिचे बयाण नोंदविले. त्यावेळी तिने पतीने मारहाण केल्याची कबुली दिली. परंतु इतके होऊनही पतीला काही करू नका, अशी विनंतीही तिने पोलिसांना केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating wife: Drunk punches nails up