भिक्षेकरी मुले बोलू लागली इंग्रजी 

file photo
file photo

अमरावती : मिरॅकल म्हणजे जादू. तथा जादू म्हणजे एखाद्याला गायब करणे किंवा एखादी वस्तू तयार करणे होय. मात्र एका ध्येयवेड्या तरुणाने आपल्या प्रयत्नातून दारूची भट्टी चालविणारे पालक, परिसरात भिक्षा मागून, कचरा वेचून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या मुलांच्या जीवनात खरोखरच परिवर्तन घडवून आणले आहे. मिरॅकल हार्टस फाउंडेशनचे पीयूष वानखडे, असे त्या ध्येयवेड्या तरुणाचे नाव असून त्यांच्या प्रयत्नाने ही मुले फाडफाड इंग्रजी बोलू लागली. 
सध्याघडीला नवसारी परिसरातील मुख्य रस्त्याच्या बाजूच्या खुल्या जागेवर असलेल्या बेड्यावरील 65 मुलांच्या जीवनात हे परिवर्तन घडले आहे. बेड्यात 60 कुटुंबे वास्तव्यास आहेत. 300 लोकांची ही वस्ती असून कचरा वेचणे, भिक्षा मागणे तथा रोजंदारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय. 

भिंत नाही, पण टिनाचे छप्पर असलेल्या हक्काच्या घरात तो मुलांना शिकवितो. मागील दीड वर्षापासून दररोज पीयूषचा हा नित्यक्रम सुरू आहे. सकाळी दोन तास पीयूष या मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे देतो. आज या बेड्यावरील मुले ए टू झेड, वन टू फिफ्टी, अआईई, देशभक्तिपर तथा बडबड गीते, संस्कार प्रार्थना तथा बर्थ डे गीत सहजरीत्या बोलू लागले आहेत. पीयूष वानखडे हा कठोरा रोडवरील हरिओम कॉलनी येथील रहिवासी. एमए संगीताचे शिक्षण घेतलेल्या पीयूषचा मुख्य व्यवसाय हा संगीत आहे. पीयूष हा स्वतः संगीत निर्माता असून अनेक गीते संगीतबद्ध केली आहेत. 

अशी झाली सुरुवात 
सकाळी मॉर्निंग वॉकला फिरताना ही मुले रस्त्यावर दिसायची. एकेदिवशी ट्रकखाली येता येता या मुलांना वाचविले. त्यांच्याशी चर्चा केली. मनात आले यांना शिक्षण द्यावे. तेव्हापासून त्यांना शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला 4-5 मुले होती. येथील काही कुटुंबांनी सुरुवातीला विरोध केला. परंतु मागे हटलो नाही. 4-5 मुलांवरून आज 65 मुले नियमित शिक्षणासाठी येतात. 

सकस आहार 
सुरुवातीला हीच मुले रस्त्याच्या बाजूचा पडलेले अन्न वेचून खायचे. त्यामुळे शिक्षणासोबतच त्यांची ही भूकही पीयूषने मिटविली. शिक्षणासोबतच मुलांना याठिकाणी सकस आहार देण्यात येतो. यासाठी पीयूषने अन्नधान्य बॅंक सुरू केली असून अनेकांचे त्याला सहकार्य मिळत आहे. 

दोन दिवस घरीच भरली शाळा 
मध्यंतरी मुलांना खरूजलेल्या कुत्र्यांचे इन्फेक्‍शन झाल्याने त्यांच्या संपूर्ण शरीरावर फोड आले होते. तेव्हा पीयूषने चार-पाच दिवस आपल्या घरीच मुलांची शाळा भरविली. मुलांच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेत त्यांच्यावर उपचार केला. यासोबतच मुलांच्या आरोग्य तपासणीसोबतच त्यांचे केस कापणे तथा कपड्यांची व्यवस्थाही पीयूष नियमितपणे करतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com