सावधान...! कुष्ठरोग अजून अस्तित्वात...!

file photo
file photo

नागपूर : कुष्ठरोग भारतातून जवळजवळ संपल्याची घोषणा केंद्र सरकारने तेरा वर्षांपूर्वी, 2005मध्ये मोठ्या थाटात केली होती. मात्र, 2017 मध्ये भारतात नव्याने सव्वा लाखाच्या वर कुष्ठरोगी आढळून आल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय कुष्ठरोग विभागाने जाहीर केल्याने हा रोग संपल्याची घोषणा वळवावरचे पाणी ठरले आहे. इतकेच नाही तर हा रोग आता पुन्हा हातपाय पसरू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी, 1 फेब्रुवारी 2017 रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या भाषणात 2018पर्यंत देशातून कुष्ठरोगाचे निर्मूलन होईल, असे सांगितले होते. याचाच अर्थ कुष्ठरोग अद्याप अस्तित्वात असल्याचे सरकारने मान्य केले होते. कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून निधी मिळतो. त्यामुळे सरकारला या कामातील प्रगती दाखवावी लागते. त्यातूनच सरकारने 2005 मध्ये कुष्ठरोगाचे दूरीकरण झाल्याचे अतिउत्साहात जाहीर केले. दूरीकरण म्हणजे दहा हजार लोकसंख्येमागे एकच कुष्ठरुग्ण (0.01 टक्के) सापडणे. भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने दहा हजारात एक सापडला तरी एकूण आकडा लाखांवर जाऊन पोचतो.
2016 मध्ये मधील जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगात सर्वाधिक कुष्ठरुग्ण भारतात आहेत. त्यावरून कुष्ठरोगाचे दूरीकरण झाल्याची घोषणा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या एका ताज्या अहवालाने तर ही बाब ठळकपणे उघड केली आहे. या अहवालानुसार एकट्या 2017 या वर्षात देशात 1,35,485 नवे कुष्ठरुग्ण आढळले आहेत. याचाच अर्थ भारतात दर चार मिनिटाला एक कुष्ठरुग्ण आढळून येत आहे. तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात कुशनपल्ली हे अडीचशे घरांचे व केवळ हजार लोकसंख्येचे छोटे खेडे आहे. तेथे नऊ कुष्ठरोगी आढळून आलेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2016मधील अहवालानुसार या रोगाचे प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये दरवर्षी हजारो नवे रुग्ण सापडत असल्याचे म्हटले होते. यातही अतिशय गंभीर बाब म्हणजे नव्याने आढळून आलेल्या कुष्ठरुग्णांपैकी जवळपास निम्म्या रुग्णांचा रोग हा पुढच्या टप्प्यात पोहोचलेला आहे.
अशी स्थिती असूनही सरकार याबाबत अधिकृतपणे आपली गंभीरता का दाखवत नाही. याचे कारण स्पष्ट आहे. देशातील कुष्ठरुग्णांची नेमकी आकडेवारी सांगणारे विश्‍वासपात्र व वैज्ञानिक सर्वेक्षण किंवा अभ्यास उपलब्ध नाही. कुष्ठरोगमुक्त देशाचा दर्जा गमावण्याच्या भीतीने सरकार नव्या रुग्णांची नोंदणी करायला तयार नसते, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. दिल्ली, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि लक्षद्वीप या ठिकाणी कुष्ठरुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत आहे. आरोग्य सूचकांकात अव्वल असणाऱ्या केरळमध्येही कुष्ठरुग्ण मोठ्या संख्येत आहेत.

शासकीय, सामाजिक अनास्था कारणीभूत : डॉ. विकास आमटे
आनंदवन (चंद्रपूर ) : तज्ज्ञ डॉक्‍टरांचा तुटवडा, शासकीय इच्छाशक्तीचा अभाव, समाजाची अनास्था यामुळे अद्यापही आपण कुष्ठरोग निर्मूलन करू शकलो नाही, अशी खंत महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी "सकाळ'जवळ व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com