वैदर्भींनो सावधान, दिवाळीच्या आनंदावर पावसाचे सावट 

file photo
file photo

नागपूर  : यावर्षी वरुणराजाने वैदर्भींची जणू अग्निपरीक्षाच घ्यायची ठरविले की काय, असे आता वाटू लागले आहे. हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस विदर्भात जोरदार वादळी पावसाचा इशारा दिल्यामुळे दिवाळीच्या आनंदावर मुसळधार पावसाचे दाट सावट घोंघावत आहे. 
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्‌टा विदर्भाच्या दिशेने वेगाने सरकत असून, त्याचा तीव्र प्रभाव पुढील काही दिवस जाणवणार आहे. त्यामुळे गुरूवारच्या मतमोजणीसह दिवाळीवरही वादळी पावसाचे गडद सावट निर्माण झाले आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे. विशेषत: पुर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. नागपूरसह इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बसरण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भाशिवाय मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रातही दमदार पावसाची शक्‍यता आहे. या "विकेंड'पर्यंत विदर्भात पावसाळी वातावरण राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. 
बळीराजावर संकट? 
यावर्षी अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस झाल्याने पिकांची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे अर्थातच बळीराजाही आनंदात आहे. मात्र संभाव्य वादळी पावसामुळे त्यांची चिंता वाढण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भिती त्यांना वाटू लागली आहे. विशेषत: धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. याशिवाय कापूस, तुर, सोयाबिन, ज्वारी आणि अन्य पिकांनाही पावसामुळे नुकसान होण्याची दाट शक्‍यता आहे. 
थंडीही गायब 
ऑक्‍टोबर महिना सुरू झाला की विदर्भात हळूहळू थंडी जाणवायला सुरूवात होते. दरवर्षी फटाक्‍यांची आतिषबाजी गुलाबी थंडीतच होते. मात्र ऑक्‍टोबर संपत आला, तरीदेखील यावर्षी थंडी पडलेली नाही. शिवाय उन्हाच्या चटक्‍यांसाठी प्रसिद्‌ध असलेल्या "ऑक्‍टोबर हिट'चाही वैदर्भींना अनुभव मिळाला नाही. पावसाचा प्रभाव कमी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या सुरूवातीला कडाक्‍याच्या थंडीला सुरूवात होईल, असे संकेत हवामान विभागाकडून मिळाले आहे. 
यंदा सहा वर्षांत सर्वाधिक पाऊस 
यंदा मॉन्सूनचे दोन आठवडे उशीरा आगमन होऊनही पावसाने विदर्भात रेकॉर्डब्रेक केलाय. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात विदर्भात सरासरीच्या (943 मिलिमीटर) 12 टक्‍के अधिक 1055 मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या सहा वर्षांमध्ये यावर्षी विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक पाऊस गडचिरोली येथे 1870 मिलिमीटर झाला, जो सरासरीच्या 48 टक्‍के अधिक आहे. नागपुरातही (1170 मिलिमीटर) सहा वर्षांतील नवा उच्चांक नोंदला गेला. यावर्षी सप्टेंबर महिन्यानेही पावसाचा नवा विक्रम नोंदविला. या महिन्यात सर्वाधिक 388 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com