एटीएममधून पैसे काढताय...सावधान !

एटीएममधून पैसे काढताय...सावधान !
नागपूर : खिशात नेहमी एटीएम कार्ड असले की केव्हाही आणि कुठेही पैसे काढल्या जातात. मात्र, गार्ड नसलेल्या एटीएममधून पैसे काढल्यास तुमच्या खात्यातील रक्‍कम लंपास होऊ शकते. सायबर गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रात सक्रिय झाली असून थेट एटीएमच्या "की पॅड'वर मोबाईल कॅमेरा लावून लोकांच्या खात्यातून पैसे उडविल्या जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.
एटीएम कार्ड जवळ असले की शहरातील कोणत्याही कोपऱ्यातून पैसे काढता येतात. मात्र, एटीएमचा वापर दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. सायबर गुन्हेगारांच्या टोळीने महाराष्ट्र राज्यात शिरकाव केल्याची माहिती आहे. ही एक्‍स्पर्ट असलेली टोळी थेट बॅंकेतील खातेधारकांना गंडा घालते. ही टोळी रात्रीच्या सुमारास एटीएमध्ये घुसते. एटीएमला पासवर्ड टाकण्यासाठी असलेल्या "की पॅड'च्या वर मोबाईल कॅमेरा लपवून ठेवतात. मोबाईल दिसू नये म्हणून की पॅडच्या वर प्लॅस्टिकची प्लेट लावतात. तसेच एटीएम कार्ड स्वाईप करण्याच्या सॉकेटला प्लॅस्टिकचा बनावट सॉकेट लावून ठेवतात. घाईगडबडीत असलेला ग्राहक मशीनमध्ये एटीएम स्वाईप करतात आणि पासवर्ड टाकतात. मशीनमधून काढलेली रक्‍कम घेऊन निघून जातात. मात्र, ग्राहकाने टाकलेला पासवर्डचा व्हिडिओ मोबाईलमध्ये सेव्ह होतो. त्यानंतर टोळीचे मुख्य काम सुरू होते. दोन दिवसाच्या आताच आपल्या खात्यातून मोठी रक्‍कम काढल्याचा आपल्याला मॅसेज येतो. हा सर्व प्रकार झारखंड राज्यातील हॅकर्स करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
गार्ड नसलेले एटीएम टार्गेट
सायबर गुन्हेगारांची टोळी ज्या एटीएमवर सुरक्षारक्षक नसतो त्या एटीएमला टार्गेट करते. त्या एटीएममध्ये मोबाईल कॅमेरा आणि प्लॅस्टिक सॉकेट बसविण्यात येते. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून की पॅडवरील कॅमेरा एका युवकाने शोधून भंडाफोड केल्याचे दिसत आहे.
काय दक्षता घ्यावी
सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएमचा वापर शक्‍यतो टाळावा. एटीएम स्वाईप करण्याचे प्लॅस्टिकचे सॉकेट हाताने ओढून बघावे. त्यानंतर पासवर्ड टाकण्यापूर्वी की पॅडच्या वरील प्लॅस्टिकची प्लेट ओढून बघावी. पैसे काढताना काही संशय असल्यास लगेच 100 वर कॉल करून माहिती द्यावी.

सायबर गुन्हेगार असे कृत्य करू शकतात. असा प्रकार घडल्यास लगेच पोलिसांना कळवा. पोलिस योग्य ती कारवाई करतील. बॅंकेने जनजागृती करावी तसेच गार्ड नेमावे. ग्राहकांच्या सुरक्षेची हमी बॅंकेने घ्यायला हवी.
- विशाल माने, सायबर सेल, नागपूर पोलिस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com