भामरागड पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले प्रशासन

भामरागड - येथे आलेल्या महापुराने बुडालेली घरे.
भामरागड - येथे आलेल्या महापुराने बुडालेली घरे.

भामरागड (जि. गडचिरोली) - भामरागड तालुक्‍याला यंदा निसर्गाने केवळ भिजवूनच नव्हे, तर सहा-सात वेळा अक्षरश: पाण्यात बुडवून टाकले. या काळात त्यांच्या मदतीला प्रशासन वेगाने धावून आले. एकीकडे पोलिस जवान बचावकार्यात जिवाची बाजी लावत असताना पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेणे, अन्न, निवाऱ्याची सोय व इतर समस्या दूर करण्यात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारीही आपला जीव धोक्‍यात घालून कार्यरत होते. 

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भीषण पूरपरिस्थितीमुळे सलग सहा दिवस भामरागडचा संपर्क तुटला होता. एकीकडे भामरागडवासींचा जगाशी संपर्क तुटला असताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार कैलाश अंडील व जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे पूरग्रस्त जनतेशी संपर्क घट्ट करण्यात आपल्या सहकाऱ्यांसह गुंतले होते. आभाळ कोसळत असताना इकडे घरेही पाण्यात बुडाली होती आणि त्या स्थितीत तहसीलदार अंडील व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सोनवणे हे आपल्या चमूसह नावेतून धोकादायक प्रवास करीत नागरिकांना अन्न, पाणी पोहोचवत होते. त्यांचे सांत्वनेचे शब्द नागरिकांना संकटाशी झुंजण्याचे बळ देत राहिले. येथे तैनात असलेले जिल्हा पोलिस, राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान मदतीसाठी दिवसरात्र कष्टत होते. 

पूरबंदोबस्तादरम्यान अंकेश शिरसाठ या पोलिस कर्मचाऱ्याचे वडील मरण पावल्याचा संदेश मिळाला. पुरामुळे सगळे रस्ते बंद असल्याने हेलिकॉप्टरने त्याला गडचिरोलीत पाठवणे हाच एकमेव पर्याय होता. मात्र, हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर भामरागड येथे पोचू शकत नव्हते. वडिलांच्या मरणाचे दु:ख बाजूला सारून हा पोलिस जवान बंदोबस्तात ताठ मानेने उभा राहिला.

हे असं काही विपरीत घडू शकेल, याची पूर्वकल्पना आली होती. ८ आणि ९ ऑगस्टच्या पुराने ही बाब अधिक स्पष्ट झाली. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर, दंतेवाडा येथे तब्बल २८८ मिमी पाऊस पडल्याने याचा तडाखा भामरागडला बसणार होता. मात्र, या परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आम्ही आधीच केली होती. भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार कैलाश अंडील व इतर विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिशय सक्षमतेने परिस्थिती हाताळली. 
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, गडचिरोली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com