भामरागड पूरग्रस्तांना "सकाळ रिलीफ फंडा'द्वारे भरीव मदत

गडचिरोली : मदतीच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविताना जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे. सोबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. एम. के. गर्ग व इतर अधिकारी.
गडचिरोली : मदतीच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविताना जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे. सोबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. एम. के. गर्ग व इतर अधिकारी.

गडचिरोली : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम, मागास व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भामरागड तालुक्‍याला अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने तब्बल सातदा तडाखा दिला. त्यामुळे येथील असंख्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना "सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमातून अन्नधान्य व तेलाच्या रूपात भरीव मदत देण्यात आली. ही मदत घेऊन आलेली वाहने शनिवारी (ता. 21) जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर भामरागडला रवाना झाली. विशेष म्हणजे भामरागडच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देणारा "सकाळ' हा पहिला माध्यम समूह ठरला आहे.
"सकाळ रिलीफ फंडा'तर्फे भामराडच्या पूरग्रस्तांसाठी लाखोंचे धान्य व तेल पाठविण्यात आले. यातील पहिल्या दोन वाहनांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वासलकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, तहसीलदार नारायण ठाकरे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले की, भामरागड तालुक्‍यात अतिवृष्टीने झालेले नुकसान मोठे आहे. प्रशासनाने तेथे निकराचे प्रयत्न करून नागरिकांची मदत केली. याची दखल दैनिक "सकाळ'ने घेत सविस्तर बातमी प्रकाशित केली. शिवाय या वृत्तपत्राने मोठी मदतसुद्धा पाठविली, ही आनंदाची बाब आहे. विविध सामाजिक संस्था मदत करत असताना "सकाळ'ने केलेल्या मदतीमुळे आमचाही उत्साह वाढल्याचे ते म्हणाले.
त्यानंतर पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात एका वाहनाला जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. ए. के. गर्ग, पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक प्रशांत दिवटे, पोलिस उपनिरीक्षक खंडारे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बलकवडे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांनी भामरागडच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी शर्थीचे प्रयत्न केले. पोलिस विभागासह सारेच विभाग या कार्यात एकदिलाने मग्न झाले होते. अनेक समस्यांचा आम्ही धाडसाने सामना केला. या काळात "सकाळ' वृत्तपत्राने आमच्या कार्याची दखल घेत वेळोवेळी सकारात्मक बातम्यांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले. लेखणी धरणारा "सकाळ'चा हात मदतीसाठीही सरसावला असून इतरही वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी असेच समाजभान दाखवत पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ही वाहने भामरागडसाठी रवाना झाली असून तेथे भामरागडचे तहसीलदार कैलाश अंडील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वात पूरग्रस्तांना मदतीचे वितरण होणार आहे. "सकाळ रिलीफ फंडा'तून मिळालेल्या या मदतीसाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने "सकाळ'चे आभार मानले.
साथी हात बढाना...
तब्बल सातवेळा पुराचा तडाखा सहन करणाऱ्या भामरागडचे नुकसान खूप मोठे आहे. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, साहित्य, पैसाअडका सारेच पुराने वाहून नेले. शेतातील पीकही वाहून गेले. अनेकांच्या अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक राहिले. आता मदतीचा ओघ सुरू झाला असला, तरी निसर्गाने दिलेली ही जखम खूप मोठी आहे. "सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या या जखमेवर हळूवार फुंकर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात नावलौकिक असलेल्या "सकाळ' वृत्तपत्राने भामरागड येथील पूरग्रस्तांचा टाहो सर्वदूर पोहोचविण्याचे काम करतानाच स्वत:ही मदतीसाठी धाव घेतली. ही खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे. त्यामुळे आमच्याही प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
-शेखर सिंह,
जिल्हाधिकारी, गडचिरोली

जिल्हा व पोलिस प्रशासन अनेक दिवसांपासून भामरागडच्या पूरग्रस्तांसाठी मदत मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. आता मदतीचा ओघ सुरू असला, तरी विविध प्रकारच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी आम्ही केलेल्या कामाला प्रसिद्धी देतानाच त्यांनी सढळ हस्ते केलेली ही मदत पूरग्रस्तांना दिलासा व आम्हाला नवी ऊर्जा देणारी आहे.
-शैलेश बलकवडे,
जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com