चौथ्यांदा तुटला भामरागडचा संपर्क, दोनशे गावांना फटका

File photo
File photo

अहेरी (जि. गडचिरोली) : एक दिवसाच्या उसंतीनंतर सुरू झालेल्या संततधार पावसामुळे भामरागडला आठवडाभरात चौथ्यांदा पुराने वेढले आहे. यामुळे जिल्ह्यातील दोनशे गावांचा संपर्क तुटला असून अनेक मार्गांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. तसेच अहेरी तालुक्‍यातील आपापल्ली गावालगत नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. शेवंता गणपत सातपुते (वय 18) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला यापूर्वी तीनदा पूर येऊन गेल्याने अनेक मार्ग बंद झाले होते. काल, मंगळवारपासून जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू असून भामरागडलगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून आज चार ते पाच फूट पाणी वाहत होते. त्यामुळे भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक आज दिवसभर बंद होती. दिना नदीला आलेल्या पुरामुळे मुलचेरा-आष्टी या मार्गाची वाहतूकही प्रभावित झाली.
दुसऱ्या घटनेत अहेरी तालुक्‍यातील आपापल्ली गावालगत नाल्याच्या पुरात शेवंता सातपुते ही विद्यार्थिनी वाहून गेली. ती महागाव येथील राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत होती. आज सकाळी ती आपापल्ली येथून सायकलने महाविद्यालयात जाण्यास निघाली. आपापल्ली आणि सुभाषनगर गावांच्या मध्ये असलेल्या नाल्याजवळ पोहोचताच तोल गेल्याने तिची सायकल नाल्यात पडली. ती सायकल ओढण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु, मुसळधार पावसामुळे प्रवाह वेगात होता. त्यामुळे ती प्रवाहात वाहून गेली. सोबत असलेल्या माधुरी चापले, सिडाम या दोघींनी शेवंताला वाचविण्याच्या प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी घटनेची माहिती पालकांना दिली. लागली आपापल्ली येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवंताचा त्यांनी शोध घेतला असता 2 कि.मी. अंतरावर मुत्तापूर नाल्याजवळ शेवंताचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळ गाठले. कंकडालवार यांच्या कार्यकर्त्यांनी शेवंताचा मृतदेह बाहेर काढला. अहेरीचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
एकीकडे शासन "बेटी बचाओ बेटी पढाओ'चा नारा देत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात रस्ते व पूल नसल्यामुळे वाहतुकीची समस्या असल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्‍यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. प्रशासनाने आपापल्ली नाल्यावर पूल बांधला असता तर शेवंताचा जीव गेला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com