याला रस्ता म्हणावा की पार्किंग! भंडारा शहरातील रस्त्यांचे झाले वाहनतळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

भंडारा : रस्ते हे आवागमन करण्यासाठी असतात. परंतु, त्यांचा चक्क वाहनतळ म्हणून वापर होत असल्याचा प्रकार शहरात दिसून येत आहे. अतिक्रमाणामुळे अरुंद रस्ते, वाहनांची वर्दळ, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची कोंडी झाली आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत वाढलेल्या गर्दीची त्यात भर पडली आहे.

भंडारा : रस्ते हे आवागमन करण्यासाठी असतात. परंतु, त्यांचा चक्क वाहनतळ म्हणून वापर होत असल्याचा प्रकार शहरात दिसून येत आहे. अतिक्रमाणामुळे अरुंद रस्ते, वाहनांची वर्दळ, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची कोंडी झाली आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत वाढलेल्या गर्दीची त्यात भर पडली आहे.
दिवाळी चार दिवसांवर आली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वर्दळ वाढल्याने रहदारीला शिस्त लावण्याची गरज आहे. भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ ही बसस्थानक ते गांधी चौक या मार्गावर वसली आहे. बसस्थानकापासून चौकाकडे निघालेल्या मुख्य मार्गावर मुख्य पोस्ट ऑफिस, जिल्हा बॅंक, मोठा बाजार तसेच कापड, भांडी, किराणा, सराफा, फर्निचरपासून अन्य दुकानांची बाजारपेठ वसली आहे. शहरातील या मेनरोडवरून दररोज शेकडो वाहनांचे आवागमन होते. या मार्गावर वाहतुकीची समस्या हा कळीचा प्रश्‍न आहे. परंतु, सणासुदीच्या दिवसात ही समस्या अधिक तीव्र रूप धारण करीत आहे. रस्त्याच्या बाजूला दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, रस्त्याच्या कडेला लागणारी फेरीवाल्यांची व स्थायी दुकाने त्यामुळे चौकापासून थेट मोठा बाजारापर्यंत या रस्त्यांची कोंडी झाली आहे. रविवारी व बुधवारी या आठवडी बाजाराच्या दिवशी या मार्गावर ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलिस नियंत्रण विभागाच्या कार्यालयासमोरचा रस्ता आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांची वाहने उभी ठेवण्यासाठी सध्या वाहनतळ म्हणून वापरला जातो. मात्र, बाजारात प्रवेश करणाऱ्यांना हे अडचणीचे ठरत आहे.

बेशिस्त वाहतुकीचा फटका
शहरातील मुख्य बाजारपेठ या मार्गावर असल्याने खरेदीसाठी आजूबाजूच्या गावातून व शहरातील नागरिकही येथे येतात. परंतु, वाहनतळ नसल्याने या नागरिकांच्या गाड्या भररस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभ्या असतात. रहदारीला त्रास होणार नाही, याची खबरदारी कोणीही घेत नाही. नागरिक, वाट्टेल त्या पद्धतीने आपली वाहने उभी करतात. याचा फटका रहदारी करणाऱ्यांना बसतो.

वाहतूक यंत्रणा सुस्त
शहरातील वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचे, शिस्त लावण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. परंतु, पोलिस मात्र फक्त सावज शोधण्यातच वेळ घालवतात. मागील दोन वर्षातील वाहतूक पोलिस यंत्रणेत शिथिलता आली आहे. यापूर्वी सणासुदीच्या दिवसात विशेष मोहीम राबवून रस्त्यावर बेशिस्तीने वाहन ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, सध्या ही मोहीम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara became a vehicle parking spot of roads