मित्रासोबत पहाटे फिरायला गेला अन्‌.... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

दाभा येथील मृत प्रथमेश व मित्र अमोल नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे व्यायाम करण्यासाठी सायकलने वरठी मार्गावर फिरायला गेले. सिरसी गावाजवळ भंडारा मार्गे येणाऱ्या भरधाव ट्रेलरने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यात प्रथमेश हा ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला.

वरठी (जि. भंडारा) : मित्रांसोबत सकाळी फिरायला जाणाऱ्या सायकलस्वार मुलांना भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. यात दाभा येथील प्रथमेश रवींद्र गायधने (वय 11) याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अमोल धनीराम पेठकर (16) हा थोडक्‍यात बचावला. ही घटना गुरुवारी पहाटे 5.50 वाजताच्या सुमारास वरठी-भंडारा राज्य महामार्गावर स्थित सिरसी गावाजवळ घडली. अपघात झाल्यानंतर ट्रेलरचालक घटना स्थळावरून पसार झाला. 

दाभा येथील मृत प्रथमेश व मित्र अमोल नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे व्यायाम करण्यासाठी सायकलने वरठी मार्गावर फिरायला गेले. सिरसी गावाजवळ भंडारा मार्गे येणाऱ्या भरधाव ट्रेलरने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यात प्रथमेश हा ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. तर सायकलस्वर अमोल हा थोडक्‍यात बचावला. या धडकेत सायकलचा अक्षरश चुराडा झाला होता. अपघात इतका भीषण होता की प्रथमेशच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता.

 

क्लिक करा -  Motivation 'झुंज एका श्‍वासासाठी' 

 

घटनेची माहिती मिळताच वरठी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. बी. ताजने ताफ्यासह दाखल झाले. दरम्यान गावकऱ्यांनी रस्ता अडवून ठेवला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे व दाभाचे सरपंच मधुकर नागपुरे यांनी घटनास्थावर जाऊन नागरिकांच्या समस्या एकूण घेतल्या. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ट्रेलर चालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून कुटुंबीयांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी पोलिसांना केली. आमदार राजू कारेमोरे यांनी कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.

 

Image may contain: 2 people, people standing, crowd, sky and outdoor
घटनास्थळी नागरिकांची झालेली गर्दी 

 

ओव्हरलोड वाहतुकीचा बळी

प्रथमेश हा भंडारा येथील खासगी शाळेत सहाव्या वर्गात व सायकलस्वर अमोल हा वरठी येथील जिल्हा परिषद शाळेत दहाव्या वर्गात शिक्षण घेत होते. ते नेहमी व्यायाम करण्यासाठी जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली. प्रथमेश रस्त्यावर धावणाऱ्या भरधाव वाहनाचा बळी ठरला. रस्त्यावरून धावणारी ओव्हरलोड भरधाव वाहतुकीमुळे रस्ते जीवघेणे ठरत आहेत.

 

Image may contain: 3 people, outdoor

 

नागरिकांनी अडवला रस्ता

गावातील मुलाचे अपघाती निधन झाल्याची बातमी पसरताच दाभा येथील शेकडो नागरिकांनी घटनास्थावर धाव घेतली. काही काळ घटनास्थळावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कारवाई करून मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्यासाठी नागरिकांनी काही काळ रस्ता अडवून ठेवला होता. पोलिस निरीक्षक एस. बी. ताजने, आमदार राजू कारेमोरे आणि नरेंद्र भोंडेकर यांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara : Child dies in accident