भंडारा शहरात शिकवणी वर्गांचे ‘पीक’

भंडारा शहरात शिकवणी वर्गांचे ‘पीक’

भंडारा - शिक्षण हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य आता पूर्णपणे व्यावसायिक झाले आहे. शिकवणी वर्ग ही काळाची गरज असली, तरी शिकवणी वर्गातून कोट्यधीश होणारे संस्थाचालक आपल्या विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा न देता वारेमाप शिकवणी शुल्क उकळत आहेत. अनेकांचे शिकवणी वर्ग पंचताराकिंत व चमचमत्या इमारतींमध्ये सुरू आहेत. महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणारे गुरुजी करचोरी करीत असल्याची चर्चा आहे. 

नगरपालिकेची परवानगी न घेता, पाहिजे त्या ठिकाणी मोक्‍याच्या रस्त्यावर असे शिकवणी वर्ग सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सायकल, दुचाकी ठेवण्यासाठी सोयीची जागा वा वाहनतळ नाही. त्यामुळे सरसकटपणे ही वाहने भर रहदारीच्या रस्त्यावर लावलेली दिसून येतात. विशेष म्हणजे, अनेकांच्या शिकवणी वर्गांमध्ये अत्यावश्‍यक सोयीसुविधांचा अभाव आहे. 

पूर्वी फक्त आठवी ते दहावी व बाराव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचीच शिकवणी घेतली जात होती. परंतु, आता पॉलिटेक्‍निक, इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांचे शिकवणी वर्ग घेणाऱ्या संस्थांचे पेव सर्वत्र फुटले आहे. राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौक या मार्गावर असे शिकवणी वर्ग मोठ्या संख्येने आहेत. 

शहरातील काही शिकवणी वर्ग हे गुपचूप शाळा शिक्षकांमार्फतच चालविले जातात. हल्ली काही शाळा व महाविद्यालयांनी थेट काही खासगी शिकवणी वर्गांशी हातमिळवणी केली आहे. शासकीय सेवेत असलेले काही शिक्षकही शिकवणी वर्ग घेत असून, या शिक्षकांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावत आहे. शासकीय शिक्षक विद्यार्थ्यांना व पालकांना आपल्या पाल्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत चांगले गुण देण्यात येतील, असे आमिष दाखविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना इच्छा नसतानाही आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भीतीपोटी संबंधित शाळेतील विषय शिक्षकांकडेच शिकवणी वर्ग लावावे लागते. शासनाने शासन निर्णय काढून शासकीय सेवेत असलेल्या कुठल्याही शिक्षकाने शिकवणी वर्ग घेऊ नये व घेतल्यास त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश असतानाही शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे कारवाया होत नाही. आतापर्यंत गेल्या दोन-तीन वर्षांत शिक्षणाधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली नाही. खासगी शिकवणी वर्गांच्या संचालकांचे व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे तर नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पालकांची लूट 

शहरात अनेक शिकवणी वर्गांतून विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची लूट चालू आहे. प्रवेश निश्‍चित करताना आधीच अर्धे शुल्क घेतले जाते. संबंधित शिकवणी वर्गातील शिक्षकवर्ग हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत कायम असावा, अशी अपेक्षा असते. परंतु, सातत्याने विषय शिक्षक बदलविले जातात. एकदा प्रवेश घेतल्यानंतर पालक व विद्यार्थ्यांना संचालकांची मनमानी सहन करावी लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com