भंडारा जिल्ह्यात कमळ कोमजले| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात कमळ फुलले होते. मात्र, या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या अतिविश्‍वासामुळे जिल्ह्यात भाजपला भोपळा मिळाला आहे.

भंडारा : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात कमळ फुलले होते. मात्र, या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या अतिविश्‍वासामुळे जिल्ह्यात भाजपला भोपळा मिळाला आहे. मतदारांनी भाजप उमेदवारांना घरचा रस्ता दाखवित भंडारा मतदारसंघातून शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, तुमसरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे व साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले यांना संधी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोष यशानंतर विधानसभेत भाजपला विजयाची आशा होती. यामुळे उमेदवारीसाठी भाऊगर्दी वाढली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विजयाचा अतिविश्‍वास असल्याने उमेदवार देतांना स्थानिक परिस्थितीचा विचार केला नाही. विद्यमान आमदारांना डावलून नवीन उमेदवारांना संधी दिली. यामुळे भाजपमध्ये नाराजीचे सूर असल्याने निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. मतदारांनी भाजपच्या नेत्यांमध्ये असलेली गुर्मी भाजपचा पराभव करून उतरविली आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेला भंडारा विधानसभा क्षेत्राची शिवसेनेनी मागणी केली होती. मात्र, भाजपने रिपाइं (आठवले) गटाच्या वाट्याला मतदारसंघ देऊन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची नाराजी ओढावून घेतली. शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली व भाजपला त्यांची जागा दाखवून दिली. तुमसर मतदारसंघात विद्यमान आमदार चरण वाघमारे भाजपकडे प्रबळ उमेदवार होते. मात्र, पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्तक्षेपामुळे प्रदीप पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली. चरण वाघमारे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल भाजपला आपली ताकद दाखविली. या मतदारसंघात भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहील.

साकोली मतदारसंघात भाजपने आयात उमेदवार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक नेत्यांमध्ये असलेली नाराजी त्यांना भोवली आहे. जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत असताना विधानसभा निवडणुकीत एकही मतदारसंघात खाते न उघडता न आल्याने भाजपची मोठी नाचक्की झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara District bjp vidhan sabha election result