भंडारा, गडचिरोलीत भाजपची मुसंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नागपूर - गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील सहा नगर परिषदांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून सहापैकी पाच नगर परिषदांमध्ये पक्षाचे अध्यक्ष निवडून आले आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला. आजच्या विजयाने विदर्भात भाजपची ताकद वाढल्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकाही जागी विजय मिळविता आला नाही. राष्ट्रवादीने दोन तर शिवसेनेने एक नगर परिषद गमावली आहे. शिवसेनेचा फक्‍त एक नगरसेवक निवडून आला असून पूर्व विदर्भात सेना नामोहरम झाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर आणि साकोली नगर परिषदेसाठी सोमवारी मतमोजणी झाली. त्यात तुमसर, भंडारा आणि साकोली येथे भाजपचे नगराध्यक्ष निवडणूक आले. भंडारा येथे सुनील मेंढे, तुमसर येथे प्रदीप पडोळे तर साकोली येथे धनवंतरा राऊत निवडून आले. या ठिकाणी भाजपचे 90 जागांपैकी 43 नगरसेवक निवडून आले. पवनी येथे विलास काटेखाये यांच्या नगरविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. येथे पूनम काटेखाये नगराध्यक्ष झाल्या आहेत. पवनीत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा फक्‍त एकच नगरसेवक निवडून आला.

गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज या दोन्ही नगर परिषदांवर भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. कॉंग्रेसचे पाच तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आला आहे. देसाईगंज येथे शालू दंडवते, तर गडचिरोली येथे योगिता पिपरे नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यांत 13 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. गडचिरोलीत मितेश भांगडिया प्रणीत युवाशक्‍तीची सत्ता होती. तर देसाईगंजमध्ये भाजपची सत्ता होती.

राष्ट्रीय समाज पक्षाचे खाते उघडले?
देसाईगंज येथील निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याच्या प्रकरणाने चर्चेत आलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने गडचिरोलीत खाते उघडले आहे. हे उमेदवार पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडून आले नाहीत. मात्र, त्यांना पक्षाने समर्थन दिले होते. या वादामुळे देसाईगंज येथील एका वॉर्डातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Bhandara, Gadchiroli BJP win