भंडारा-गोंदियात राजकीय तोफा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

नागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धुराळा उडविणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुढील आठवड्यात प्रचारात उतरणार आहेत. या नेत्यांच्या प्रचारसभांमुळे भर उन्हाळ्यात राजकीय वातावरण आणखीच तापणार आहे.

येत्या 28 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी येत्या 26 मे रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. भाजपचे उमेदवार हेमंत पटले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी फडणवीस व गडकरी दोन नेते या निवडणुकीत प्रचारात सहभागी होणार आहेत. 20 मे रोजी गडकरी व 23 मे रोजी फडणवीस या मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या या मतदारसंघात भाजपचा पराभव होऊ नये, यासाठी हे दोन्ही नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीने पणाला लागली आहे. नाना पटोले यांनी मागणी करूनही हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्याकडे राखला आहे. या निवडणुकीत मधुकर कुकडे यांच्या प्रचाराची धुरा खासदार प्रफुल्ल पटेल व कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उतरणार आहेत. अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील पुढील आठवड्यात प्रचारासाठी येणार आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभांची माहिती मिळालेली नाही.

Web Title: bhandara-gondia loksabha byelection politics congress BJP