भाजपतर्फे हेमंत पटले, राष्ट्रवादीची कुकडेंना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

भंडारा - २८ मे रोजी होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. भाजपने गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हेमंत पटले यांची तर; राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.  

भंडारा - २८ मे रोजी होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. भाजपने गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हेमंत पटले यांची तर; राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.  

काँग्रेसवासी झालेल्या नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नाना पटोले व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांचे मनोमीलन होऊन ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे जाहीर केले. मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत.

१९९५ मध्ये ते पहिल्यांदा तुमसर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर ते सलग तीन वेळा भाजपचे आमदार झाले. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार चरण वाघमारे यांनी त्यांचा पराभव केला.

भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांनी २००४ ते २००९ या कालावधीत गोरेगाव विधानसभा  क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आहे. ते भाजप सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी आजवर पक्षाच्या अनेक पदावर कार्य केले आहे. पटले हे पोवार समाजाचे असून कुकडे हे कुणबी समाजाचे आहे. दोन्ही उमेदवारांचे आपापल्या समाजात प्राबल्य असल्याने याकडे निवडणुकीला चुरस निर्माण झाली आहे. 

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती झाली. मात्र, पोटनिवडणुकीच्या युतीच्या संदर्भात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहेच. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांना शिवसेनेकडून उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली आहे. युतीचा निर्णय न झाल्याने भाजप, शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारामध्ये लढत होईल. याशिवाय बसप, भारिप-भमसं यांचे उमेदवार रिंगणात राहणार आहे.

पटले आज भरणार नामांकन 
भाजपचे उमेदवार हेमंत पटले उद्या, बुधवारी (ता. ९) नामांकन दाखल करणार आहेत. गांधी चौकातील जलाराम मंगल कार्यालयातून भाजपची मिरवणूक निघणार आहे. यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल करतील. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे गुरुवारी (ता. १०) नामांकन दाखल करणार आहेत. 

Web Title: bhandara gondia loksabha election hemant patale madhukar kukade politics