आता बोला : दूध संघाने थकविले 18 कोटींचे चुकारे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने दूधपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांचे चुकारे 15 आठवड्यांपासून थकीत आहेत. त्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या असून, दूध उत्पादकांना देयके देण्यास असमर्थ ठरल्या आहेत.

भंडारा : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ दूध उत्पादकांना देयके देण्यास असमर्थ ठरल्या आहेत. त्यामुळे दूध संघाने थकीत चुकारे द्यावे, अन्यथा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा दूधपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी निवेदनातून दिला आहे. 

Image may contain: one or more people

भंडारा जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक दुधाचे उत्पादन करतात. जिल्ह्यातील सहकारी संस्थांद्वारे या दुधाचा पुरवठा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाला केला जातो. जिल्ह्यात जवळपास 350 सहकारी संस्था आहेत. 30 हजार शेतकरी दुधाचे उत्पादन करतात. जिल्हा संघाने एप्रिल ते जून महिन्यांतील नऊ आठवड्यांचे चुकारे या सहकारी संस्थांना अदा केले नाही. त्यानंतरही ऑक्‍टोबर ते नोव्हेंबरदरम्यान सहा आठवड्यांचे चुकारे थकविले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 17 ते 18 कोटी रुपये मिळाले नाहीत. 

अन्यथा दूधपुरवठा बंद 

Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoor
भंडारा : दूध संघाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करताना दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी.

जिल्हा दूध संघाद्वारे ज्या संस्थांना दूध व इतर पदार्थांचा पुरवठा करतो. त्या संस्थांकडून अग्रीम राशीची उचल केली आहे. इकडे जिल्ह्यातील पुरवठादार असलेल्या सहकारी संस्थांचे चुकारे थकीत आहेत. त्यामुळे संघाकडून थकीत रक्कम मिळण्याबाबत संस्थांना शाश्‍वती राहिली नाही. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथील अखिल सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यात थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी. अन्यथा संघाला दूधपुरवठा बंद करण्याचा निर्णय पुरवठादार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. 

पदाधिकाऱ्यांची निदर्शने 

बैठकीला विलास काटेखाये, शिवराज गिऱ्हपुंजे, गोपीचंद बोरकुटे, धनपाल उरकुडे, शरद इटवले, योगेश मोहरकर, रमेश पडोळे, संजय तळेकर आदींसह अनेक संस्थाचालक उपस्थित होते. यानंतर जिल्ह्यातील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा दूध संघाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. थकीत चुकारे त्वरित देण्याच्या मागणीचे निवेदन देऊन रविवारपासून दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

संचालकांचा हिशेब चोख 

Image may contain: food

जिल्हा दूध संघाचे 11 संचालक असून त्यांच्या नातेवाइकांच्या नावाच्या संस्था आहेत. या सर्व संस्थांना मात्र, वेळोवेळी चुकारे दिलेले असून, काही संस्थांचे एक ते दोन आठवड्याचे चुकारे बाकी आहेत. मात्र, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संस्थांचे 17 ते 18 आठवड्यांचे चुकारे थकीत आहेत. तसेच एक लिटरही दूध पुरवठा करण्याची क्षमता नसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या संस्थांमधून अचानक 400 ते 1000 लिटर दूध पुरवठा सुरू झालेला आहे. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी केल्यावर त्यातील गैरव्यवहार उघड होतील, असे दूध संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांनी सांगितले. 

हेही वाचा : मुलीची ममता : आईचा मृतदेह बघताच मुलीनेही घेतला जगाचा निरोप

 

चुकारे मिळाले नाही 
आमच्या संस्थेचे 55 लाख रुपये दूध संघाकडे थकीत आहेत. त्यामुळे संस्थेने पुरवठा कमी केला आहे. संस्थेला चुकारे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांना वेळेवर रक्कम देता आली नाही. 
- शिवराज गिऱ्हेपुंजे, संस्था संचालक, लाखनी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara: Milk team exhausts 18 crores