esakal | भंडारा : कोंढा येथील सावकाराचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भंडारा : कोंढा येथील सावकाराचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : गेल्या 15 ऑगस्टपासून चालकासह बेपत्ता असलेल्या कोंढा येथील सावकाराचा खून करण्यात आल्याचे शुक्रवारी उघड झाले. अड्याळ पोलिसांनी मौदा (जि. नागपूर) शिवारातून मृतदेह उकरून उत्तरीय तपासणीसाठी आणला. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोंढा (कोसरा) येथील रामकृष्ण भगवान कुर्झेकर (वय 40) याचे चालकासह अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्याच्या पत्नीने 20 ऑगस्टला अड्याळ पोलिस ठाण्यात केली होती. त्यावरून पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद केली. मात्र, मृताचे टाटा सफारी हे वाहन नागपूर येथे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी रामकृष्ण व त्याच्या चालकाचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिस निरीक्षक सुरेश ढोबळे यांनी संशयितांची विचारपूस सुरू केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींना पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यात मृताचा चालक विनोद गिऱ्हेपुंजे याचाही समावेश आहे.
या आरोपीने मृताकडून उधार रक्कम घेतली होती. 15 ऑगस्टला लाखनी येथील एटीएममधून पैसे काढून रक्कम परत करतो सांगून त्याला टाटा सफारीने लाखनीला नेले. वाटेतील तिर्री येथे इतर दोघे मिळाले. त्यानंतर नागपूरला जाऊन ते दारू प्याले. त्यानंतर परत लाखनीजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला थांबले. येथे चालक व रामकृष्णाला सोडून इतर तिघे दारू आणण्यास परत लाखनीकडे गेले. तेथून परतताना त्यांनी भरधाव वेगातील टाटा सफारी रामकृष्णाच्या अंगावर चालवली. त्यात याचा जागीच मृत्यू झाला. याबद्दल चालक विनोद गिऱ्हेपुंजे याला पूर्वसूचना असल्याने तो मृतापासून दूर बसला होता. त्यानंतर आरोपींनी गाडीच्या डिक्कीतून मृतदेह मौदा येथील एनटीपीसी परिसरात आणून झुडपी जंगलात पुरला. यानंतर चालक विनोद याने रामकृष्णाची दुसरी पत्नी राहत असलेल्या नागपूर येथील घरासमोर टाटा सफारी उभी ठेवून ते चौघे बसद्वारे गावी कोंढा येथे परत आले.
अड्याळ पोलिसांनी शुक्रवारी यातील स्वप्नील गिऱ्हेपुंजे, अमोल कुर्झेकर, तेजस आडे आणि विनोद गिऱ्हेपुंजे यांना अटक केली. या आरोपींना न्यायालयाने 29 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top