बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
भंडारा : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पलाडी शिवारात आज, बुधवारी सकाळी नर बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना रस्ता अपघाताची नसून विजेच्या झटक्‍याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
भंडारा : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पलाडी शिवारात आज, बुधवारी सकाळी नर बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना रस्ता अपघाताची नसून विजेच्या झटक्‍याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
पलाडी शिवारातील राजस्थानी ढाब्याजवळ महामार्गापासून 50 फूट अंतरावर आज, बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बिबट मृतावस्थेत आढळला. याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयात माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलय भोगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्याला गडेगाव आगारात आणले. पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त विलास गाडगे, डॉ. सुरेश निपाने यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. या वेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहायक वनसंरक्षक चोपकर, वनपरिक्षेत्राधिकारी भोगे, वनपाल, वनरक्षक व वनकर्मचारी उपस्थित होते. मृत बिबट अंदाजे तीन ते साडेतीन वर्षांचा आहे. त्याच्या शरीरावर अपघाताच्या कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण विजेचा शॉक असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. अन्य ठिकाणी विजेच्या झटक्‍याने मृत झाल्यावर बिबट्याला राष्ट्रीय महामार्गालगत आणून टाकले असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत ढाकणा वनपरिक्षेत्रातील भांडूम बीटअंतर्गत आपट्याच्या झाडाखाली वाघ मृतावस्थेत आढळला असून त्याचे शरीर कुजलेले होते. सोमवारी (ता. नऊ) ही घटना उघडकीस आली. 9 एप्रिल रोजी वनरक्षक व त्यांचे पथक ढाकणा वनपरिक्षेत्रात भांडूम बीटमध्ये गस्तीवर असताना त्यांना दुर्गंध आला. पाहणी केली असता, एका आपट्याच्या झाडाखाली वाघाचा कुजलेला मृतदेह आढळला. अंदाजे तीन दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झालेला असावा. ज्या ठिकाणी मृत वाघ आढळला तेथून दोनशे मीटर अंतरावर पाणवठा आहे. मृत वाघाच्या पोटात रानडुकराच्या मांसाचे तुकडे आढळले. त्याची नखे, दात आणि कातडी जशीच्या तशी होती. यावरून वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वनाधिकारी विशाल माळी यांनी सांगितले. मृत वाघाचे वय अंदाजे आठ ते नऊ वर्षे आहे. वन गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्‍वानपथकाने व्याघ्र प्रकल्पातील घटनास्थळाचा परिसर पिंजून काढला; परंतु ठोस प्रतिसाद मिळाला नाही. वन्यजीव अभ्यास व एनटीसीएचे विशाल बनसोड, सावन देशमुख यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वीच दोन उच्चस्तरीय समित्यांचे पदाधिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर होते. बुद्धपौर्णिमेला (30 एप्रिल) मचाणावरून वन्यप्राणिगणना केली जाईल. त्या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडल्याने व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या विषयाला गांभीर्याने घेतले आहे.

 

Web Title: Bhandara news Leopard found dead