...अन् भंडारावासींचे टाऊन रेल्वेस्टेशन होण्याचे स्वप्नही भंगले! 

railwayline
railwayline

भंडारा : वरठी ते जवाहरनगर आयुध निर्माणीपर्यंत असलेला रेल्वेमार्ग इतिहासजमा झाला असून, रेल्वेमार्ग उखडण्याचे काम बुधवारपासून (ता. १२) सुरू झाले आहे. यामुळे भंडारा शहरात कधीतरी टाऊन रेल्वेस्टेशन होईल, असे भंडारावासींचे स्वप्नही भंगले आहे. 

जवाहरनगर आयुध निर्माणीत दारूगोळा व इतर मालाची ने-आण करण्यासाठी भंडारा रोड रेल्वेस्टेशनपासून जवाहरनगर दरम्यान १९६३-६४ साली ही रेल्वेलाइन टाकली होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने भंडारा शहरात ५० एकरची जमीन खरेदी केली, तर जवाहरनगर ते भंडारा रोड या १३ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी जागेचे अधिग्रहण केले होते. त्यावेळी रेल्वेमार्गासाठी आयुध निर्माणीने खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुरुवातीला या मार्गावर डिझेल इंजिन असलेली मालगाडी धावत होती. कालांतराने मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले. तेव्हा महिन्यातून चार ते सहा गाड्यांची ये-जा होत होती. रेल्वेगाडी धावणे बंद झाल्याने हायटेंशन कॉपर वायर चोरीचे प्रमाण वाढल्याने रेल्वेचा सुरक्षा विभाग व आयुध निर्माणी प्रशासन त्रस्त झाले होते. या रेल्वेमार्गाचा आयुध निर्माणीच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा आहे. 

१९९० च्या दशकापर्यंत आयुध निर्माणीतून उत्पादित मालाची रेल्वेद्वारे वाहतूक केली जात होती. परंतु त्यानंतर वाहतूक खर्च आणि वेळ वाचविण्याच्या प्रयत्नात आयुध निर्माणीने रस्ते मार्गाची निवड केली. तेव्हापासून जवाहरनगर-भंडारा रोड या रेल्वे मार्गाचा वापर पूर्णपणे बंद झाला होता. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेरूळ उखडण्याचे आदेश पाच वर्षांपूर्वीच झाले होते. परंतु, रेल्वे प्रवासी संघटनांच्या दबावामुळे रेल्वे रूळ उखडण्याचे काम टाळण्यात आले होते. दरम्यान, नागरिकांच्या मागण्यांवरून शहरात रॅक पॉइंट आणि भंडारा ते भंडारा रोडपर्यंत शटर ट्रेनबाबत सर्वेक्षणही करण्यात आले होते. परंतु, रेल्वेरूळ आता काढल्यामुळे भविष्यात कधीही शटल ट्रेन किंवा टाऊन रेल्वे स्टेशन होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com