नव्या पाणीपुरवठा योजनेचे काय झाले?

उदय राऊत
सोमवार, 9 डिसेंबर 2019

शहरातील दूषित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी 58 कोटी रुपयांच्या नवीन वाढीव योजनेचे काम पालिकेद्वारे हाती घेण्यात आले. 22 फेब्रुवारीला दसरा मैदानावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान तब्बल दहा महिन्यांचा कालावधी लोटूनही काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.

भंडारा : शहरातील नागरिक तब्बल एका तपापासून दूषित व अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. नाग नदीचे सांडपाणी व गोसेखुर्दचे पार्श्‍वजल यांनी वैनगंगेचे प्रदूषण वाढविले आहे. ही दुसरी बाजू आहे.

जीर्ण व फुटलेल्या अंतर्गत जलवाहिन्या, टाकाऊ व कालबाह्य झालेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेतून येणारे पाणी पिऊन भंडारावासी आपली तहान भागवीत आहेत. दरम्यान सत्ताबदलानंतर नगरविकास मंत्रालयाच्या नव्या आदेशाने ही योजना प्रभावित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

नागरिकांना पाणीटंचाईचा सामना

No photo description available.
संग्रहित छायाचित्र

बहुतांश जलवाहिन्या नाल्या, गटारातून गेल्या आहेत. या जलवाहिन्या ठिकठिकाणाहून फुटल्या असल्याने नाल्या, गटारातील पाणी या जलवाहिन्यांमध्ये प्रवेश करून नागरिकांच्या घराघरांमध्ये जात असते. पाइपलाइन कमी व्यासाच्या असल्याने योग्य त्या दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे वर्षभर, विशेषत: उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नळाला एक गुंडही पाणी येत नसताना बिल मात्र भरावे लागत आहे. या समस्येतून लवकरच आपल्याला मुक्ती मिळेल, अशी भंडारेकरांची आशा होती. परंतु, ती तूर्तास तरी पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत.

पाणीपुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना

पालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात शुद्ध व स्वच्छ पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. विद्यमान खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या प्रयत्नाने युती सरकारच्या काळात अखेर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेअंतर्गत शहरात अतिरिक्त चार पाण्याच्या टाक्‍या विविध भागामध्ये तयार करण्यात येणार आहेत.

अधिक व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. अशुद्ध पाणीपुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आधुनिक पद्धतीचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात येत आहे. त्यामाध्यमातून शहरात व नवीन वसाहतींमध्ये मुबलक पाणीपुरवठा होईल. प्रतिदिन प्रतिव्यक्ती किमान 135 लिटर स्वच्छ पाणीपुरवठा होईल. 15 हजार घरांत नळ जोडण्यास दिल्या जातील, असे नियोजन आहे.

Image may contain: one or more people and closeup
संग्रहित छायाचित्र

दहा महिने उलटले

18 महिन्यांत दोन टप्प्यांत भंडारावासींना पिण्याचे शुद्ध पाणी 24 तास मिळेल, असा शब्द श्री. बावनकुळे यांनी भूमिपूजनाच्या वेळी दिला होता. परंतु, दहा महिने लोटूनही पाण्याची एक टाकीसुद्धा उभी झालेली नाही. दसरा मैदानावर मोठ्या प्रमाणात पाइप पडून आहेत. जुन्या टाकीजवळ जलशुद्धीकरणासाठी खोल खोदकाम केले आहे. एका ठिकाणी कॉलम उभारले जात असून बांधकाम अत्यंत सावकाश सुरू आहे. केवळ चार ते पाच मजूर या ठिकाणी कामावर दिसतात.

हेही वाचा : काय? ऐतिहासिक वास्तूला लागली "तहान

नगरविकासचा आदेश डोईजड

सत्ताबदल होताच नगरविकास विभागाद्वारे नगरपरिषद आणि नगरपंचायतीअंतर्गत प्रस्तावित विकासकामांना स्थगितीचे आदेश दिले आहेत. तसेच विविध विकासकामांना वितरित केलेल्या निधीवरही रोख लावला आहे. या आदेशामुळे या योजनेतील अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी घाईघाईने भूमिपूजन उरकण्यात आले. तरीही पाहिजे त्या वेगाने कामाला सुरुवात झाली नाही. जून महिन्यात दसरा मैदानात कंत्राटदाराने ठेवलेले लाखो रुपयांचे केबल पाइप जळून खाक झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara :What happened to the new water supply scheme?