कधी मिळणार गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीद्वारे प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. 16) गोसेखुर्द येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील अनेक गावातील प्रकल्पग्रस्त महिला, पुरुष सहभागी झाले होते. 

भंडारा : पवनी तालुक्‍यात गोसेखुर्द येथे इंदिरा सागर प्रकल्पाचे काम 1983 पासून आजपर्यंत रखडलेले आहे. या प्रकल्पामुळे 14 हजार 984 कुटुंबे विस्थापित झाले. भंडारा जिल्ह्यातील 34 आणि नागपूर जिल्ह्यातील 51 गावे बाधित झाल्याने या गावांचे पुनर्वसन करण्यात आले.

विस्थापित झालेल्या कुटुंबाची शेती धरणात गेल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट आले आहे.  जमिनीचा मोबदला, पुनर्वसन, स्थलांतरासाठी प्रकल्पग्रस्तांना सतत संघर्ष करावा लागत आहे. मात्र, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांत निराशा आहे.

मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना

याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीद्वारे सोमवारी गोसेखुर्द येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यात विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. दुपारी मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. 

No photo description available.

घरबांधणी अनुदान मिळावे 

दिलेल्या निवेदनानुसार, सर्व प्रकल्पग्रस्तांना मोबदला, पॅकेज, पुनर्वसन याचा लाभ मिळाला पाहिजे. गावठाणात नागरी सुविधा झाल्या पाहिजे. प्रत्येक कुटुंबाला भूखंड, घरबांधणी अनुदान मिळाले पाहिजे. विस्थापितांना रोजगाराची साधने व कमी व्याजावर आर्थिक सहाय्य देण्यात यावे, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाने वाढीव कुटुंबांना नोकरीऐवजी दोन लाख 90 हजार रुपये वाटपाची प्रक्रिया सुरू करावी. 

हेही वाचा की : हिवाळी अधिवेशन : सरन्यायाधीश बोबडे शेतकऱ्यांप्रती आस्था असलेले व्यक्तिमत्त्व
 

तीन गावांचे पुनर्वसन कधी? 

पाथरी येथील उर्वरित कुटुंबांना भूखंड व घरबांधणी अनुदान देण्यात यावे, गावातील शिल्लक जागा त्वरित संपादित करावी, पर्यायी गावठाणात घरकर व वीजकर पूर्णपणे माफ करावा, शालेय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देण्यात यावा, धरणातील इकार्नियाचे निर्मूलन करण्यात यावे, मासेमारांना गोसेखुर्द जलाशयात आरक्षण व मासेमारीचा अधिकार देण्यात यावा.

 त्यांना तांत्रिक सोयी उपलब्ध करून द्याव्यात, गावठाणासाठी ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्यांना 2013 च्या पॅकेजचा लाभ देण्यात यावा, शेती व पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. खापरी रेहपाडे, टेकेपार, रुयाड या गावांचे त्वरित पुनर्वसन करावे आदी अनेक मागण्यांचा समावेश आहे. 

हे वाचा : कांदा हवाय, 20 रुपये अतिरिक्‍त भरा!
 

यांनी केले नेतृत्व 

आंदोलनाचे नेतृत्व विलास भोंगाडे यांनी केले. यावेळी धर्मपाल भुरे, किशोर समरित, यमीक्षा गणवीर, सोमेश्‍वर भुरे, दादा आगरे, झिबल गणवीर, विनोद शेंडे, नामदेव तितीरमारे, रमेश भेंडारकर यांच्यासह अनेक गावातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara : When will the Gosekhurdh project victims get justice?