अन्‌ अपहरण करून युवकाचा केला खून... वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अपहरण करून आरोपींनी माझ्या मुलाचा खूनच केल्याची तक्रार मृताच्या आईने पोलिसांत केली आहे. भंडारा येथील वैनगंगा नदीच्या पात्रात मुलाचा मृतदेह आढळून आला होता. 

भंडारा : येथील वैनगंगा नदीच्या पात्रात गेल्या शनिवारी (ता. 30) नागपूर येथील विजेश गोसावी याचा मृतदेह आढळून आला होता. विजेशचे रायपूरवरून अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी त्याचा खून केल्याची तक्रार मृताची आई सोनाबाई आकाराम गोसावी यांनी पोलिसांत दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आता तपासकार्याला वेग दिला आहे. 

विजेश गोसावी हा जगनाडे चौकाजवळ गोसावी वस्तीत राहत होता. गावोगावी जाऊन आयुर्वेदिक औषधांचा दुकानांना तो पुरवठा करीत होता. व्यवसायाच्या कामावरून त्याची रायपूर येथील धीरज मोकालवार याच्यासोबत ओळख झाली होती. धीरजने रायपूर येथे पैसे घेण्यासाठी विजेशला फोन करून तेथे बोलावून घेतले होते. त्यामुळे 25 ऑक्‍टोबरला विजेश कुटुंबासह रायपूर येथे गेला. तो रायपूरला येत असल्याची माहिती धीरज याने याच व्यवसायातील नागपूर येथील सहादेव गोसावी याला दिली होती. त्यामुळे सहादेव पाच ते सहा जणांना घेऊन रायपूरला गेला होता. 

विजेशचे केले अपहरण 

Image may contain: one or more people

28 ऑक्‍टोबरला विजेश रायपूर येथे धीरजच्या औषधाच्या दुकानात गेला. तेव्हा तेथे आधीपासून असलेले सहादेव गोसावी व इतरांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर ते त्याला सोबत आणलेल्या वाहनात जबरदस्तीने कोंबून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. याबाबत मृताच्या आईने सहादेव गोसावी व इतरांकडे विचारणा केली होती. परंतु, त्यांनी काहीही न सांगता टाळाटाळ केली होती. 

नदी पात्रात आढळला मृतदेह 

यानंतर 30 ऑक्‍टोबरला भंडारा येथे वैनगंगा नदीच्या पात्रात विजेशचा मृतदेह आढळून आला. त्यावरून सहादेव गोसावी व त्याच्यासोबत असलेल्या पाच ते सहा जणांनी विजेशचे अपहरण केले. त्यानंतर मारहाण करून त्याचा खून केला आणि मृतदेह वैनगंगा नदीत टाकला, अशी तक्रार सोनाबाई गोसावी यांनी रविवारी भंडारा पोलिसांत केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

 वाचा : जीपने केला पाठलाग अन्‌ मंगेशचा झाला गेम

रायपूर येथे अपहरणाचा गुन्हा 

Image may contain: 1 person

रायपूर येथे आरोपी सहादेव (बाबा) गोसावी व इतर तीन ते चार जणांनी 28 ऑक्‍टोबरला धीरज याच्या दुकानात पैसे देण्यासाठी विजेशला बोलावून घेतले होते. तेथे त्याच्यासोबत भांडण करून आरोपींनी विजेशला आपल्या वाहनातून पळवून नेले. त्यावेळी तेथे असलेले नोकर सोनू व प्रत्यक्षदर्शीना जिवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती, अशी तक्रार मृताच्या पत्नीने छत्तीसगड येथील रायपूर पोलिसांत केली आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विजेशचा खून झाला की त्याने आत्महत्या केली याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara : youth murder in raipur