अन्‌ "त्यांनी' उचलला हेमाडपंती मंदिरांच्या स्वच्छतेचा विडा 

सकाळ वृत्तसेवा
06.13 AM

शहरातील मेंढा परिसरात गिरीगोसावींची समाधीस्थळे असलेली हेमाडपंती 
मंदिरे ऐतिहासिक व धार्मिक वारसा म्हणून प्रसिद्ध आहेत. पुरातत्त्व विभागाने ही जागा आपल्या ताब्यात घेऊनही ही मंदिरे दुर्लक्षित व ओसाड पडून होती. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या शंभो नारायण ग्रुपच्या उत्साही तरुणांनी येथे चार दिवस स्वच्छता अभियान राबवून परिसराचा कायापालट केला.

भंडारा : मेंढा येथील हेमाडपंती मंदिरे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. येथे लक्ष्मी-नारायण मूर्ती व शंकराची पिंड आहे. त्यांचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून इतिहासप्रेमी पाठपुरावा करीत आहेत. अखेर गेल्या काही वर्षांपूर्वी या भागात संरक्षक भिंत बांधण्यात आली. ही भिंतसुद्धा अपूर्ण आहे. मात्र शंभो नारायण ग्रुपच्या सदस्यांनी या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. त्यामुळे येथील हेमाडपंती मंदिरांचा कायापालट झाला आहे. 

Image may contain: outdoor

या भागात सहसा कोणी भटकत नसल्याने अवैध दारूविक्री, मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांनी या मंदिरांना आपला अड्डा बनविला. येथील मंदिराच्या सभोवताल गवत, काटेरी झुडपे व पसरणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणात उगवल्या होत्या. मंदिरावरसुद्धा ऊन, पावसामुळे शेवाळ व काजळी साचून आतील व बाहेरील भाग काळवंडला होता. 

युवकांनी केला संकल्प 

भंडारा शहरातील वारसा असणाऱ्या या स्थळाची अशाप्रकारे दुर्लक्षामुळे होत असलेली वाताहत येथून जवळच असलेल्या चांदणी चौकातील युवकांना दिसली. जिल्हा सामान्य रुग्णालयात धर्मशाळेत, स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम, रक्तदान, वृक्षारोपण, सागरतलाव विसर्जनाची सोय अशा विधायक कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शंभो नारायण ग्रुपच्या सदस्यांनी या ठिकाणीसुद्धा स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प केला. 

परिसरात स्वच्छता मोहीम 

Image may contain: people standing, sky and outdoor

या ग्रुपमधील सदस्यांनी आपल्या रोजच्या कामातील वेळ काढून तसेच सुटीच्या दिवशीही सामूहिकपणे श्रमदान करून मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या उत्साही तरुणांनी स्वयंस्फूर्तीने शनिवार(ता. 30) पासून स्वच्छतेचे काम हाती घेतले. चार दिवसांत वाढलेले गवत, खुरटी झाडे, झुडपे काढून टाकण्यात आली. मंदिराचे गर्भगृह, कळस व वरील भागात घसाई करून स्वच्छता केली. 

यांनी घेतला सहभाग 

या मोहिमेत निरंजन निनावे, नंदू उपरीकर, गोवर्धन निनावे, शिशुपाल गाढवे, कुणाल बोकडे, प्रेम खुटेल, विशाल भुरे, कृपाल तांडेकर, राजेश फुलसुंगे, रजत भुरे, गौरव नरगे, संजय बागडे, प्रद्युम्न निनावे, आकाश बोकडे, रवी खेडकर, सोपान उपरीकर, रवी खंडरे, दिनेश लिमजे, हरीश निनावे, शुभम भोवते, हिमांशू बावणे, गोलू आंबिलकर, ईश्वर साखरकर, चंदू पराते, रजत केळवदे, बंडू पराते यांनी सहभाग घेतला. 

का हाणली आमदारांनी होमगार्डच्या कानशिलात?...वाचा 
 

युवकांचे कौतुक 

अत्यंत निरपेक्ष भावनेने तरुणांनी हाती घेतलेले हे काम अत्यंत कौतुकास पात्र आहे. नगरपालिकेला तसेच धार्मिक कर्मकांड करणाऱ्या लोकांना जे सुचले नाही. ते या तरुणांनी करून दाखविले. नगरसेवकांची नजर केवळ मलिदा लाटणाऱ्या कामांवर असते. एरवी आपल्या भागात असलेला ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी कोणीही धडपडताना दिसत नाही. मात्र येथील शंभो नारायण ग्रुपच्या सदस्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केल्याने आता त्यांचे कौतुक केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara : youths of Shambho Narayan Group do it Cleaning of Hemadpanti temples