जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदारात खडाजंगी

भंडारा : व्यासपीठासमोर गदारोळ करताना विरोधी पक्षातील सदस्य.
भंडारा : व्यासपीठासमोर गदारोळ करताना विरोधी पक्षातील सदस्य.

भंडारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जनसुविधासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे व आमदार चरण वाघमारे यांच्यात खडाजंगी झाली. सत्ताधारी व विरोधक सदस्यांनी व्यासपीठासमोर गोंधळ घातल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविले.
आज, गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, खासदार मधुकर कुकडे, आमदार डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे, ऍड. रामचंद्र अवसरे, बाळा काशीवार आदी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी जनसुविधेचा मुद्दा उपस्थित केला. विविध विकासकामांचे नियोजन करून आवश्‍यक निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली. तीन-चार वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी करूनही अद्याप निधी प्राप्त झाला नाही. जनसुविधांच्या यादीत आमदारांनी हस्तक्षेप केला असल्याचा आरोप अध्यक्षांनी केला. जिल्हा वार्षिक नियोजन लेखाशीर्ष 3054 व 5054 अंतर्गत जिल्हा परिषदेने इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या विकासकामाचे नियोजन करून आवश्‍यक निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली. मात्र, यावर काही निर्णय झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आमदार चरण वाघमारे यांनी सभाध्यक्षांची परवानगी घेत शासननिर्णयाची माहिती दिली. दरम्यान, अध्यक्षांनी आक्षेप घेत आमदारांना बोलण्यास मज्जाव केला. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदारामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन प्रकरण हातघाईवर आले होते. यावेळी सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी पालकमंत्र्यांच्या व्यासपीठासमोर येत सभेत गदारोळ घातला. त्यामुळे पोलिस बोलवावे लागले. पालकमंत्र्यांनी वेळीच मध्यस्थी केली नसती तर प्रकरण चिघळण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती. दोघांची समजूत काढून अखेर वाद शांत करण्यात आला. मात्र, जिल्हा नियोजन समितीची बैठकीतील वातावरण तापल्याने जिल्हा परिषद वर्तुळात एकच चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com