30 वर्षांपासून दररोज "भारत माता की जय'चा जयघोष

राजेश प्रायकर
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नागपूर : केवळ स्वातंत्र्यदिन, गणतंत्रदिन किंवा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान देशभक्तीची भावना उफाळून येत असल्याचे दिसून येते. मात्र, गेली 30 वर्षे दररोज "भारत माता की जय'चा जयघोष करीत देशभक्तींचा हुंकार चेतवित आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेल्या राष्ट्रवंदनेतून उद्यानामध्ये सकाळी फिरण्यास येणाऱ्या हजारो नागरिकांत दररोज देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम ज्येष्ठ नागरिक करीत आहे.
दत्तात्रनगरातील संत ज्ञानेश्‍वर उद्यानात दररोज हजारो नागरिक फिरण्यास येतात. मात्र, यातील जय श्रीराम योगाभ्यासी मंडळातील ज्येष्ठ नागरिक फिरण्यास येणाऱ्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत आहेत. विविध क्षेत्रातून निवृत्त झालेले हे ज्येष्ठ नागरिक आणि काही तरुण मंडळीही दररोज व्यायाम व योगाभ्यासाठी येतात. गेली तीस वर्षे उद्यानांमध्ये कवायत, योगासने केल्यानंतर हे सर्व ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली राष्ट्रवंदना सामूहिकरित्या गात आहेत. "तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा' ही राष्ट्रवंदना गात शेवटी "भारत माता की जय'चा जयघोष करीत परिसरात राष्ट्रभक्तीचा हुंकार चेतवित आहेत. तीन मिनिटांच्या या राष्ट्रवंदनेतून दररोज देशभक्तीची भावना निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत. वय वाढले असले तरी अजूनही मनाने तरुण असलेली ही मंडळी प्रत्येकाचेच वाढदिवसही तेवढ्याच उत्साहाने साजरे करतात. रामनवमी, हनुमान जयंती आदी धार्मिक कार्यक्रमासह विरंगुळा म्हणून समूहाने बाहेर फिरण्यास जाण्याचे कार्यक्रमही ते आयोजित करतात. आयुष्याच्या संध्याकाळीही त्यांची ऊर्जा तरुणांनाही प्रेरणा देणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यात गणेश जयस्वाल, नामदेव नौकरकर, बबन टिकास, अशोक घोषिकर, सतीश बांगरे, घनश्‍याम चौधरी, सतीश नाईक, विष्णु माहुरे, प्रभाकर सव्वालाखे, रमेश भोयर, भोतमांगे, शिरीष गंपावार, अशोक कोठाळे, प्रशांत आसरे, नारायण शाहू, महेश बनोदे, बंटी चौधरी, हरीनारायण शाहू, मनोहर जयस्वाल, राजू कावळे, कमलाकर थोटे, चंद्रकांत बनोदे, दिनेश मौंदेकर, सुभाष देशमुख, रामेश्‍वर कापसे, रेवतकर, दिलीप बनोदे, प्रवीण मस्के आदींचा समावेश आहे.
समाधानाय, सौख्याय...
समाधनाय, सौख्याय...तसेच ओम भुर्भूव स्वः ही धार्मिक प्रार्थनाही सामूहिकरित्या केली जाते. या प्रार्थनेतून आधात्म्यालाही महत्त्व देत उद्यानात धार्मिक वातावरणही कायम ठेवले जात आहे. याशिवाय रामनवमी, हनुमान जयंतीला आरती, हनुमान चालिसाही म्हटल्या जाते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Bharat Mata Ki Jai" every day for 30 years