बीएसस्सी नर्सिंगच्या प्राचार्यपदी भारत मुनेश्‍वर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम 2006 साली सुरू झाले. 13 वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अद्याप पदनिर्मितीचा प्रश्‍न सुटला नाही. दरवर्षी धोक्‍यात येत असलेली बीएसस्सी नर्सिंगची मान्यता येथे कार्यरत ट्यूटरच्या भरवशावर मिळते. कोणताही अतिरिक्त मोबदला न घेता हे सारे ट्यूटर सेवाभावी परिचारिका घडविण्याचे पुण्यकर्म निवृत्तीच्या शेवटच्या दिवशीपर्यंत इमानेइतबारे करीत आहेत. नुकतेच प्रभारी प्राचार्यपदावरून मीना तिवारी निवृत्त झाल्या असून त्यांच्या जागेवर आता प्रभारी प्राचार्यपदावर भारत मुनेश्‍वर यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे सरकारी बीएसस्सी नर्सिंग आहेत. या सर्वच ठिकाणी पदवी अभ्यासक्रम असल्याने
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने सेवा ज्येष्ठतेनुसार प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशी तात्पुरत्या स्वरूपात पदे निर्माण करीत प्रभारावर काम करण्याची संधी कार्यरत ट्यूटर यांना दिली. सेवाज्येष्ठतेनुसार संधी मिळाल्यामुळे साऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. वर्ष-दोन वर्षांत बीएसस्सी नर्सिंगच्या आस्थापनेचा तिढा सुटेल, असा विश्‍वास साऱ्यांनाच होता. यामुळे सारे ट्यूटर्स शिक्षणाचा धर्म निभावत राहिले. परंतु, तत्कालीन संचालक डॉ. वासुदेवराव तायडे, डॉ. प्रवीण शिनगारे यांनी या विषयाला रेंगाळत ठेवले. आता डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या कोर्टात यांच्या आस्थापनेचा चेंडू आहे. तेरा वर्षांत आलेल्या सर्व सचिवांनीही पदनिर्मितीच्या आश्‍वासनांची यांना खैरात वाटली. सेवाभावी परिचारिका घडवण्याचा धर्म निभावत राहू, असा संकल्प जणू या कर्मचाऱ्यांनी केला आहे. नुकतेच भारत मुनेश्‍वर यांनी पदभार स्वीकारला असून यापूर्वी त्यांनी अंबेजोगाईत प्राचार्यपदावर सेवा दिली आहे.
आश्‍वासनावर विश्‍वास
ठेवून निवृत्त झालेले ट्यूटर
बीएसस्सी नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्यपदापासून तर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकपद मिळेल या आशेवर नागपूरच्या बीएसस्सी नर्सिंगमधील आशा शिमगेकर, सुमती देवधर, संजय पाटील, अनघा खेरकर, मीना तिवारी निवृत्त झाले आहेत. तर राज्यातील रेझिना डायस, अनिता परदेसी, स्वाती कांबळी, श्रीमती मिस्त्री, प्रीती वैद्य, श्रीमती आकुट, अडसूळ यांनी मागील 13 वर्षांत सेवा देत कोणत्याही लाभाशिवाय निवृत्त झाले. मीना तिवारी यांनी 37 वर्षे सेवा दिल्यानंतरही अखेरपर्यंत अन्याय सहन केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com