महासंघाच्या गर्दीने कॉंग्रेसला धसका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नागपूर - भारिप बहुजन महासंघाने आयोजित केलेल्या वंचित आघाडीच्या जाहीरसभेसाठी चांगली गर्दी जमल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांना घाम फुटला आहे. एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा दौरा वेळेवर रद्द झाल्यानंतरही लोक सभा सोडून गेले नाहीत.

नागपूर - भारिप बहुजन महासंघाने आयोजित केलेल्या वंचित आघाडीच्या जाहीरसभेसाठी चांगली गर्दी जमल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांना घाम फुटला आहे. एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा दौरा वेळेवर रद्द झाल्यानंतरही लोक सभा सोडून गेले नाहीत.

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघ व एमआयएममध्ये आघाडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही नेत्यांची संयुक्त सभा आज (ता. 13) नागपुरात आयोजित केली.

यासाठी नागपुरातील सर्वांत मोठ्या मैदानाची सभेसाठी निवड करण्यात आली होती. खासदार असदुद्दीन ओवैसी यासभेत काय बोलणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. परंतु तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या शपथविधीला उपस्थित राहावयाचे असल्याचे कारण देऊन खासदार ओवैसी नागपुरात आले नाही.

या सभेसाठी दुपारपासून लोक सभास्थळी येत होते. नागपूर बाहेरूनही लोकांनी आपापल्या वाहनांनी नागपूर गाठले होते.

ओवैसी न आल्याने भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांचेच मुख्य भाषण झाले. कॉंग्रेससोबत आघाडी करणार काय? याबद्दल आंबेडकर यांनीही काहीच स्पष्ट केले नाही.

नागपुरातील जाहीर सभेत यासंदर्भात पत्ते उघड करतील, अशी शक्‍यता होती. परंतु, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला त्यांनी अद्यापही नेमके काय ते सांगितलेले नाही. या सभेला आलेल्या गर्दीने भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांचा हुरूप निश्‍चितपणे वाढला आहे व कॉंग्रेस नेत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Web Title: Bharip Mahasangh Meeting Congress Politics