खैरलांजीतील पीडित भय्यालाल भोतमांगे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नागपूर - बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातील पीडित कुटुंबप्रमुख भय्यालाल भोतमांगे (वय 62) यांचे आज (शुक्रवार) हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. हत्याकांडानंतर शासनातर्फे त्यांना भंडारा येथील म्हाडा वसाहतीत सदनिका देण्यात आली होती. तसेच त्यांची समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली होती. 

नागपूर - बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातील पीडित कुटुंबप्रमुख भय्यालाल भोतमांगे (वय 62) यांचे आज (शुक्रवार) हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. हत्याकांडानंतर शासनातर्फे त्यांना भंडारा येथील म्हाडा वसाहतीत सदनिका देण्यात आली होती. तसेच त्यांची समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली होती. 

भंडारा येथे वसतिगृहात दुपारी दोनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने भंडारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नागपूरमधील श्रीकृष्ण रुग्णालयात आणत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यातील खैरलांजी येथे 29 सप्टेंबर2006 रोजी माणुसकीला काळिमा फासणारे हत्याकांड घडले होते. 29 सप्टेंबर 2006 ला भोतमांगे यांच्या कुटुंबातील पत्नी सुरेखा (वय 38), मुलगी प्रियांका (वय 18), सुधीर (वय 22) आणि अंध रोशन (वय 18) अशी चौघांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी 1 ऑक्‍टोबर 2006 ला गुन्हा दाखल करून 27 डिसेंबरला सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने 47 जणांना आरोपी केले होते. परंतु, 36 जणांची न्यायालयाने सुटका केली. 

शेवटी 11 आरोपींवर खटला चालला. 4 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह एकूण 36 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यापैकी महादेव झंझाळ हा प्रत्यक्षदर्शी फितूर झाला. यासाठी त्याला 3 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. खून, पुरावा नष्ट करणे, बेकायदेशीररीत्या मंडळी जमवणे व दंगा करणे या आरोपांखाली आठ आरोपींना दोषी ठरवले, तर दोघांची पुराव्याअभावी व एकाला संशयाचा फायदा देऊन न्यायालयाने सुटका केली. त्यापैकी दोघांना जन्मठेप व सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. हा निकाल सत्र न्यायालयाचे न्या. दास यांनी 24 सप्टेंबर 2009 रोजी दिला होता. आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली. न्यायालयाने हत्याकांडातील सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना 25 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निर्णयाला भय्यालाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

अंत्यविधी कुठे? 
भय्यालाल भोतमांगे यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर उद्या, शनिवारी मृतदेह भंडारा येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर येथेच अंत्यविधी करण्यात यावा अशी भूमिका काही संघटना व समाजबांधवांनी घेतली आहे. मात्र, भोतमांगे कुटुंबातील चार सदस्यांवर देऊळगाव (ता. मोहाडी) येथे अंत्यविधी झाले होते. त्यामुळे भय्यालाल यांच्या पार्थिवावरही याच ठिकाणी अंत्यसंस्कार व्हावे, अशी भूमिका परमानंद मेश्राम व काही समाजबांधवांनी घेतली आहे. मतभेद असल्याने नेमके अंत्यसंस्कार कुठे होतील, याबाबत संभ्रम आहे.

Web Title: Bhayyalal Bhotamange died