भीम आर्मी पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

अमरावती : भीम आर्मीचे प्रदेश महासचिव मनीष पुंडलिक साठे (वय 40) यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केल्याचा आरोप करून संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 22) पोलिस आयुक्तालयावर धडक देऊन, पोलिसांविरुद्ध नारेबाजी केली.

अमरावती : भीम आर्मीचे प्रदेश महासचिव मनीष पुंडलिक साठे (वय 40) यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केल्याचा आरोप करून संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 22) पोलिस आयुक्तालयावर धडक देऊन, पोलिसांविरुद्ध नारेबाजी केली.
एका शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीविरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली. साठे हे रविवारी (ता. 21) रात्री सव्वाअकराच्या सुमारास स्कॉर्पिओने घराकडे जात असताना, गांधीचौकात चार ते पाच जणांनी शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. झटापट करणाऱ्यांनी 100 ग्रॅमची सोन्याची चेन, 45 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, दीड ग्रॅमची बाली, मोबाईलसह एक परवाना असलेले पिस्टल असा 6 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज लुटून काहींनी पळ काढला. त्यापैकी एकाला जखमी साठे यांनी पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी साठे यांच्या तक्रारीवरून तुळशीराम शंकर दांडेकरसह पाच जणांविरुद्ध दरोडा, मारहाण प्रकरणीगुन्हा दाखल केला. हल्ल्यानंतर रविवारी रात्री काही युवकांनी शहर कोतवाली ठाण्यावर धाव घेतली.
रविवारी घडलेल्या घटनेनंतरचे संतप्त पडसात सोमवारी (ता. 22) उमटले. शेकडो पदाधिकाऱ्यांनी सीपी कार्यालयावर धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. शिष्टमंडळाने पाचही हल्लेखोरांविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याची मागणी रेटली. कारवाई न झाल्यास शहर बंदचा इशारा यावेळी दिला.
सीसीटीव्हीमध्ये दोघेच मारेकरी
हल्ल्याच्या आरोपानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात मनीष साठे यांच्यासोबत दोघांची झटापट झाल्याचे दिसते. हे फुटेज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दाखविले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. दुसऱ्याच्याही अटकेच्या हालचाली सुरू आहे, असे पोलिस उपायुक्त शशिकांत सातव म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhim Army officer accused of assault