भीमेला आला महापूर; हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली

दावल इनामदार
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

ब्रह्मपुरी : वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे सध्या तालुक्यातील नदीकाठच्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी मंगळवारी तामदर्डी आणि उचेठाण या नदीकाठावरील गावांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच नागरीकांना दोन महिन्याचे आगाऊ रेशनचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रह्मपुरी : वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे सध्या तालुक्यातील नदीकाठच्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी मंगळवारी तामदर्डी आणि उचेठाण या नदीकाठावरील गावांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच नागरीकांना दोन महिन्याचे आगाऊ रेशनचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

तिर्थक्षेत्र माचणूर येथील जठाशंकर मंदिरासह बठाण,उचेठाण,माचणूर, वडापूर, अरळी आदी को.प.बंधारे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. तसेच तामदर्डी गावाचा संपर्क तुटला आहे. मंगलवेढा -सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरिल बेगमपुर पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिल्या.

उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील आणि पुणे जिल्ह्यातील 18 धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने दौंड येथून दोन लाख 18 हजार 253 क्युसेसने पाणी भीमा नदीत सोडले आहे. उजनी धरणातून एक लाख 50 हजार क्युसेसने पाणी भीमा नदीत सोडल्यामुळे शिवाय वीर धरणाचे पाणी नीरा नदीतून सोडल्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदीकाठ गावात धोका निर्माण झाला आहे. 

नदीकाठी असलेल्या उचेठाण, बठाण, तामदर्डी, राहटेवाडी, ब्रह्मपुरी, माचनूर, सिद्धापूर, तांडोर, बोराळे, अरळी या गावाला महसूल प्रशासनाने पथके नेमुन दिली आहेत. तर गावात दवंडी देऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगलवेढाचे तहसीलदार स्वप्नील रावडे,पोलिस निरीक्षक अनिल गाडे, आरोग्य विभाग आदि यांच्यासहित नदीकाठी जाऊन सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

तर गेल्या दहा वर्षापासून प्रथमच नदी पात्रात महापुर आल्यामुळे  लोकांनी पाणी पाहण्यासाठी व पाण्यासोबत सेल्फी काढून घेण्यासाठी बेगमपूर पुलावर गर्दी केली.

नदीकाठावर शेतीच्या सिंचनासाठी मोठया प्रमाणात विद्युत मोटारी बसविल्या आहेत. नदीला पाण्याचा विसर्ग वाढल्याने पहाटेपासून शेतकर्‍यांची मोटारी काढण्यासाठी लगबग सुरू होती. प्रशासनाकडून नदीकाठावरील शेतकर्‍यांना सावधानतेचा इशारा या पूर्वी दिल्याने मोटारी भिजून शेतकर्‍यांचे होणारेे नुकसान टळले आहे. 

- बठाण, उचेठाण, माचणूर,वडापूर, अरळी असे पाच को.प.बंधारे व जटाशंकर मंदिर पाण्याखाली 
- तामदर्डी गावाला पुराचा फटका बसत असल्यामुळे महसूल प्रशासन झाले अलर्ट 
- मंदिरात राहण्याची केली व्यवस्था
- बाधीत लोकांना दोन महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय
- नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
- रात्री उशीरा तामदर्डी गावचा संपर्क तुटण्याची शक्यता 
- बुधवारी सकाळी जवळपास दोन लाख क्युसेसने माचणूर येथे विसर्ग असण्याची शक्यता 
- नदीचा विसर्ग वाढल्यास माचणूर रहाटेवाडी, बोराळे मार्ग बंद होण्याची शक्यता

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima river floods cause thousands of hectare land go under water