कळसाविना असलेले भोंडा महादेव मंदिर,उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष

भटाळा येथील भोंडा महादेव मंदिर.
भटाळा येथील भोंडा महादेव मंदिर.

चंद्रपूर :  इतिहासाच्या अंधारगुहेत अनेक रंजक कथा दडून बसल्या आहेत. अशीच एक कथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्‍यात येत असलेल्या भटाळा या गावातील प्राचीन मंदिराची. हे मंदिर "भोंडा महादेव' नावाने ओळखले जाते. कधीकाळी या प्राचीन मंदिराच्या कळसावर वीज कोसळली होती. पुनर्निर्मिती करताना कळसाविनाच बांधकाम केले. मंदिराच्या डोक्‍यावर कळस आणि अमलक नसल्याने या मंदिराला "भोंडा महादेव' असे नाव पडले. उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देत हजारो वर्षांपासून हे मंदिर उभे आहे.

हेही वाचा : प्रेमविवाहाचा करुण अंत, गर्भपात झाल्याने नवविवाहितेने केले असे
 
चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. चंद्रपूर शहरात असलेल्या अनेक प्राचीन वास्तू गोंड साम्राज्याची साक्ष देत आजही उभ्या आहेत. गोंड राजाचे राज्य प्रस्थापित व्हायच्या हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास जिल्ह्याच्या भूगर्भात दडला आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, गुप्त, परमार, चालुक्‍य, नागवंशीय राजांनी चंद्रपूरच्या भूमीवर राज्य केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. या राजांनी आपल्या राज्यकाळात अनेक वास्तू आणि मंदिरांची निर्मिती केली होती.

कालौघात काही वास्तू नष्ट झाल्या, काही आजही आपला सुवर्ण इतिहासाच्या कथा सांगत उभ्या आहेत. अशीच एक वास्तू म्हणजे "भोंडा महादेव' मंदिर. वरोरा-चिमूर मार्गावर सालोरी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या भटाळा या गावात हे मंदिर आहे. माणिकगडाचे राजे परमार यांनी या मंदिराची निर्मिती केली. मंदिराचा कालखंड दहावे शतक आहे. परमार राजे शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिवमंदिरांची निर्मिती केली.

परमार राजाच्या चलनावर शिवपिंडाचे प्रतीक कोरले असायचे. राजुरा तालुक्‍यातील विहीरगाव येथे परमार राजाला सोन्याची नाणी सापडली होती.
भटाळा येथील मंदिरात विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पिंडीचा वारीमार्ग सरळ भिंतीत गेला असून, त्यामुळे प्रदक्षिणेला आपसूकच अटकाव होतो. वारीमार्गाच्या या रचनेमुळे हे मंदिर एक परिपूर्ण मंदिर समजले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरत असते. मंदिरावर कोरलेली उत्कृष्ट शिल्पकला बघण्यासाठी पर्यटकांचा ओढा असतो.

असे पडले नाव
या प्राचीन मंदिराच्या कळसावर कधीकाळी वीज कोसळली होती. विजेमुळे मंदिराचा कळस आणि अमलकाला हानी पोहोचली. पुनर्निर्मिती करताना कळसाविनाच बांधकाम करण्यात आले. मंदिराच्या डोक्‍यावर कळस आणि अमलक नसल्याने या मंदिराला "भोंडा महादेव' नाव पडले. डोक्‍यावर काही नसणे त्याला "भोंडा' म्हणतात. चंद्रपूर जिल्ह्याच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देत हे मंदिर उभे आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com