भूमिअभिलेख कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

दिग्रस (जि. यवतमाळ) : घराची नोंद करून फेरफार व आखीव पत्रिका देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिग्रस येथील भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदारास गुरुवारी (ता. 25) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

दिग्रस (जि. यवतमाळ) : घराची नोंद करून फेरफार व आखीव पत्रिका देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिग्रस येथील भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदारास गुरुवारी (ता. 25) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
अजबराव उघडे (वय 46) असे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. उघडे हा कर्मचारी दिग्रस येथील भूमिअभिलेख कार्यालयात निमतानदार पदावर कार्यरत आहे. तक्रारकर्त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी पत्रानुसार त्यांच्या वडिलांचे नावे असलेल्या राहत्या घराची नोंद घेणे, फेरफार व आखीव पत्रिका नक्कल देण्यासाठी अडीच हजार रुपयांची मागणी उघडे यांनी केली होती. तडजोडीअंती दीड हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रारदाराने केली होती. त्यानुसार गुरुवारी दिग्रस तहसील कार्यालयासमोर असलेल्या चहा दुकानाजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक डोंगरदिवे, पोलिस उपअधीक्षक मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, कर्मचारी सुरेंद्र जगदळे, नीलेश पखाले, भारत चिरडे, किरण खेडकर, विजय अजमिरे, राकेश सावसाकडे यांच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhoomi abhilekh department employee trapped acceptiing bribe