गवई झाले वैदर्भींचे "भूषण'

भूषण गवई
भूषण गवई

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती शिफारस केल्याने वैदर्भींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. मूळचे अमरावतीचे असलेले गवई यांची जडणघडण नागपुरात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश असताना त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक धाडसी निर्णय दिले.
लोकशाहीचा महत्त्वाचा भाग असलेल्या न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम आहे. या विश्वासास पात्र ठरण्यासाठी न्यायव्यवस्थेचा सजग प्रहरी म्हणून मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील माजी राज्यपाल रा. सू उपाख्य दादासाहेब गवई. डोक्‍यावर दादासाहेब गवईंचे छत्र होते. त्यांच्याच सावलीत भूषण गवई यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. अमरावती आणि मुंबईला शिक्षण झाल्यानंतर त्यांनी ऍड. गुरू साहनी, ऍड. राजाभाऊ भोसले यांच्या हाताखाली काही दिवस काम केले. पुढे नागपुरात त्यांनी स्वतंत्र वकिली सुरू केली. न्यायालयीन लढ्याची छाप त्यांच्या कर्तृत्वातून झळकत होती. न्यायालयात आलेल्या नागरिकांना जलद तसेच स्वस्त न्याय देण्यासाठी प्रयत्न झाल्यास सर्वसामान्यांचा या यंत्रणेवरील विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होते, हे न्यायमूर्ती गवईंचे ठाम मत.
विशेष असे की, उपराजधानीत दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. मेयो आणि मेडिकल या नावाने ही वैद्यकीय महाविद्यालये प्रसिद्ध आहेत. येथे रुग्णांना अतिविशेषोपचार उपलब्ध होत नव्हते. या आशयाची याचिका दाखल करण्यात आल्यानंतर मात्र मेडिकल आणि मेयोचा कायापालट करण्यात न्यायमूर्ती भूषण गवईं यांचा मोठा वाटा आहे. मेडिकलमध्ये दीडशे कोटी रुपयांची पंतप्रधान आरोग्य योजना कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यापासून तर मेयोतील एमबीबीएस आणि एमडीच्या जागांवरची नेहमीची असलेली टांगती तलवार त्यांनी आपल्या आदेशातून दूर केली. याशिवाय राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाशी संबंधित शवविच्छेदन विभागाचे आधुनिकीकरण करण्यासाठी 60 कोटी शासनाने मंजूर केले. ते न्यायमूर्ती गवईंच्या आदेशामुळेच. एकूणच विदर्भातील आरोग्य सुधारण्यात मोलाचा वाटा गवईंचा आहे. प्रत्येक घटकास न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य वकील आणि न्यायमूर्ती या भूमिकेतून त्यांनी वठविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com