रेतीचे उत्खन्न व वाहतूक प्रकरणी प्रथमच मोठी कारवाई  

पंजाबराव ठाकरे 
गुरुवार, 29 मार्च 2018

एकाही वाहनधारकाकडे रॉयल्टी आढळून आली नाही. यातील वाहनचालकांनी पलायन केले. दरम्यान, दोन दिवसानंतर २३ वाहनचालकांविरुद्ध तामगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत जवळपास दीड लाख रुपये किमतीची रेती जप्त करण्यात आली आहे. 

संग्रामपूर - तालुक्यातील पातुर्डा येथील खेळ दळवी, जानोरी मेळ हद्दीतील पूर्णा नदीपात्रात स्वामित्व शुल्क बुडवून राजरोसपणे रेतीचे उत्खन्न व वाहतूक होत असल्याने तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी २३ वाहने पकडली. मात्र, एकाही वाहनधारकाकडे रॉयल्टी आढळून आली नाही. यातील वाहनचालकांनी पलायन केले. दरम्यान, दोन दिवसानंतर २३ वाहनचालकांविरुद्ध तामगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत जवळपास दीड लाख रुपये किमतीची रेती जप्त करण्यात आली आहे. 

रेती चोरीमुळे पूर्णा नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. शेकडो ब्रास रेतीची चोरी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. यामुळे रेतीमाफियांविरोधात प्रभारी तहसीलदार समाधान राठोड यांनी कारवाई सुरू केली आहे. २७ मार्च ला तहसीलदार समाधान राठोड, नायब तहसीलदार धीरेंद्रराज पवार व मंडळ अधिकारी उकर्डे यांनी शासकीय चारचाकी वाहन नसताना दुचाकींवर प्रवास करत पूर्णा नदी गाठली. वाहनांची तपासणी करण्यात आली असता रेती वाहतुकीची रॉयल्टी कोणाकडेच नव्हती. रेतीने भरलेली वाहने तहसीलला लावण्यास सांगितले असता वाहनचालकांनी नकार देत घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी नायब तहसीलदार पवार यांच्या फिर्यादीवरून तीन दिवसांनंतर २३ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे वाहन चालक नदीतच वाहने सोडून फरार झाले असल्याने १२ पोलिस कर्मचारी दोन दिवस नाद पात्रात मुक्कामी होते. ही सर्व वाहने जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये रेतीचा अवैध साठा आहे. २३ वाहनचालकांच्या यादीसह जप्त केलेल्या वाहनांचे क्रमांक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे वाहनमालकांचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. पूर्णा नदीपात्रात वाहने उभी असून या वाहनांभोवती तामगाव पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास ठाणेदार डी. बी. इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पारवे करीत आहेत.

Web Title: Big action for in the area of excavation and trafficin the sand